World Hindu population : जगात हिंदूंची लोकसंख्या १२ टक्क्यांनी वाढली ! – ‘प्यू रिसर्च सेंटर’

वॉशिंग्टन – ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या मते वर्ष २०१० ते २०२० या कालावधीत जगात हिंदूंची लोकसंख्या १२ टक्क्यांनी वाढली. ही संख्या अनुमाने ११० कोटींवरून अनुमाने १२० कोटी झाली आहे. अहिंदूंची लोकसंख्यासुद्धा जवळजवळ त्याच दराने वाढली आहे.

१. वर्ष २०२० पर्यंत जगातील बहुतेक हिंदू (९९ टक्के) आशिया-पॅसिफिक प्रदेशात रहातात. उर्वरित हिंदू बहुतेक उत्तर अमेरिका किंवा मध्य पूर्व-उत्तर आफ्रिका प्रदेशात रहातात.

२. भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेश यांसारख्या दक्षिण आशियाई देशांमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये थोडीशी घट झाली; परंतु हा पालट ५ टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोचला नाही.

३. वर्ष २०१० ते २०२० या दशकात मध्य पूर्व-उत्तर आफ्रिका प्रदेशात हिंदूंची संख्या सर्वांत वेगाने वाढली. येथे हिंदूंची संख्या ३२ लाख (६२ टक्के वाढ) झाली. उत्तर अमेरिकेत हिंदूंची लोकसंख्या ३६ लाख झाली, म्हणजेच हिंदूंची लोकसंख्या ५५ टक्क्यांनी वाढली.

४. भारत आणि नेपाळ वगळता मॉरिशस हा एकमेव देश आहे, जिथे हिंदूंचा सर्वांत मोठा गट आहे. मॉरिशसमध्ये एकूण लोकसंख्येच्या ४८ टक्के हिंदू आहेत.

५. जगातील ९५ टक्के (११० कोटी) हिंदू भारतात रहातात. वर्ष २०२० पर्यंत भारत (७९ टक्के) आणि नेपाळ (८१ टक्के ) या दोन देशांमध्ये हिंदू बहुसंख्य आहेत.

६. ब्रिटनमध्ये ११ लाख आणि संयुक्त अरब अमिरात ११ लाख हिंदू आहेत.

७. ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या नवीन अभ्यासानुसार, या प्रदेशांमध्ये हिंदूंची लोकसंख्या अहिंदु  लोकसंख्येपेक्षा अधिक वेगाने वाढली. याचे मुख्य कारण म्हणजे हिंदू चांगल्या नोकर्‍या आणि चांगले जीवन यांच्या शोधात श्रीमंत देशांमध्ये गेले. बरेच हिंदू अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये गेले. युरोपमध्ये हिंदूंच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली, जी २२ लाखांपर्यंत पोचली आहे.

संपादकीय भूमिका

असे असले, तरी पाकिस्तान, बांगलादेश येथे हिंदूंचा वंशसंहार चालूच आहे. भारतातही बंगाल आणि काश्मीर येथे वेगळी स्थिती नाही. हिंदूंच्या लोकसंख्या वाढीपेक्षा हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण होणे, तो वाढणे आणि धर्मरक्षणासाठी हिंदूंनी कृतीशील होणे आवश्यक आहे !