International Education City Navi Mumbai : नवी मुंबई येथे होणार ‘आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी’; ५ देशांतील विद्यापिठांची होणार स्थापना !

मुंबई – राज्यशासनाच्या ‘मुंबई रायझिंग – क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंतर्गत नवी मुंबई येथे ‘आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी’ (आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहर) उभारण्यात येणार आहे. यामध्ये ॲबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो युरोपीओ दी दिझाईन, या ५ परदेशी विद्यापिठांना मुंबई अन् नवी मुंबई येथे शाखा स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अधिकृतपणे ‘इरादापत्रे’ प्रदान करण्यात आली आहेत. १४ जून या दिवशी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते ही इरादापत्र या विद्यापिठांच्या प्रतिनिधींना प्रदान करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

भारतामध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे आणि परदेशी विद्यापिठांना महाराष्ट्रात शाखा स्थापन करण्याची संधी देणे, ही या उपक्रमाची मुख्य उद्दिष्टे आहेत. या प्रकल्पाच्या अंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ५ किलोमीटर परिसरात १० नांमाकित परदेशी विद्यापिठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे. ही देशातील पहिली अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय ‘एज्युकेशन सिटी’ ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोद्वारे ‘मुंबई रायझिंग – क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ची उभारणी केली जाणार आहे. या विद्यापिठांमध्ये भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.