रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे राज्यातील १० जिल्ह्यांत वारकर्‍यांचा मार्ग खडतर !

  • रस्त्यांवर प्रचंड खड्डे

  • अनेक ठिकाणी कामांसाठी रस्ता खोदलेल्या अवस्थेत

  • खडी आणि चिखल यांतून वारकर्‍यांना चालावे लागणार

छत्रपती संभाजीनगर – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वारकर्‍यांना श्री विठुरायाच्या दर्शनाचे वेध लागले असून पंढरीच्या वारीसाठी शेकडो दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. ६ जुलै या दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यापूर्वीच दिंड्या पंढरपूर येथे येतील. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, सोलापूर, अकोला, अहिल्यानगर, पुणे, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती आणि बुलढाणा या १५ जिल्ह्यांतील पालखी मार्गांची पहाणी केली असता तेथील रस्ते खडतर असल्याचे दिसून आले. या रस्त्यांवर खड्डे, चिखल आणि खडी असल्याने वारकर्‍यांना या रस्त्यांवरूनच पालखी घेऊन पायी जावी लागणार आहे. काही ठिकाणी पालखी मार्ग गुळगुळीत आहे. अमरावती, नांदेड, हिंगोली, जालना आणि जळगाव या ५ जिल्ह्यांतील रस्ते चांगले आहेत.

संत एकनाथ महाराजांची दिंडी १८ जून या दिवशी पंढरपूरसाठी‎ प्रस्थान करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ष २०१७-१८ मध्ये पैठण ते पंढरपूर आणि पहिल्या टप्प्यात‎ पैठण ते नगर जिल्ह्यातील खेडापर्यंतच्या पालखी मार्गासाठी ७०५ कोटी‎ रुपयांचे प्रावधान केले होते. मार्गाचे काम‎ चालू झाले; मात्र पैठणजवळील चनकवाडीजवळील मार्गाची स्थिती बिकट झाली आहे. अल्पावधीतच खड्डे पडल्याने आता त्यावरूनच वारकर्‍यांना चालावे लागणार आहे. शेगाव वारी हा संपूर्ण मार्ग भक्तांसाठी खडतर आहे. श्रीक्षेत्र नागझरी, बाळापूरसह अनेक ठिकाणी अद्यापही काम चालूच आहे. मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. २ जून या दिवशी ‘श्रीं’चा पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतरही नागझरी मार्गावरील काम चालू आहे. शेगाव ते अकोला या ५० किमीच्या मार्गाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वारकर्‍यांचे हाल होण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका

पंढरीची वारी प्रत्येक वर्षी ठरलेल्या कालावधीतच निघते. असे असतांना प्रत्येक वर्षी वारकर्‍यांना निरनिराळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. पालखी मार्गातील मूलभूत सोयी-सुविधांची पूर्वसिद्धता प्रशासनाकडून आधीच का केली जात नाही ? हे प्रशासनाला लज्जास्पद ! यातील दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी आता वारकरी आणि समस्त हिंदू यांनी पुढाकार घेतला पाहिजे !