जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी ‘आचारधर्म’!

प्रथमच आचारधर्माची संहिता घोषित !

वारकरी (प्रतीकात्मक छायाचित्र)

पुणे – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र देहूमधून १८ जून या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या वारीसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यांतून वारकरी देहूमध्ये जमा होण्यास प्रारंभ झाला आहे. यंदा देहू संस्थानने वारकरी आणि भाविक यांसाठी प्रथमच ‘आचारधर्म’ (नियमावली) घोषित केली आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे तृतीय चिरंजीव श्री नारायण महाराज यांनी १६८५ या वर्षी आषाढीवारी पालखी सोहळ्यास प्रारंभ केला. तेव्हापासून आषाढी वारीसाठी वारकर्‍यांची संख्या वाढत गेली. आता त्याचा महावटवृक्ष झाल्याचे सर्वांच्या निदर्शनास येत आहे. श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर अशा मार्गाने ती वारी शिस्तबद्ध पद्धतीने जाते. वारीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडता नेहमीच निर्विघ्नपणे पार पडते. नव्याने सहभागी होणार्‍या भाविकांना सोहळ्याचे आचार (नियम) ठाऊक व्हावेत, यासाठी प्रथमच ‘आचारधर्म’ (नियमावली) घोषित करण्यात आली आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज (डावीकडे ) व संत ज्ञानेश्वर माऊली

असा आहे आचारधर्म !

  • दिंडीतील सर्व पताका (वारकरी ध्वज) सुती कापड असलेल्या आणि काव रंगाचा वापर केलेल्या असाव्यात.
  • पताकाधार्‍यांच्या मागे टाळकरी, मृदंगवादक, विणेकरी, तुळशीवाली आणि महिला वारकरी असा क्रम असावा.
  • दिंडीतील वारकर्‍यांनी पांढरेशुभ्र धोतर, शर्ट, टोपी अथवा पायजमा परिधान करावा.
  • विणेकर्‍याने धोतर, फेटा परिधान करणे आवश्यक आहे.
  • दिंडीतील भजन हे वारकरी संप्रदायाच्या देहूकर फडाप्रमाणे असावे. भजन, गौळण, हरिपाठ हे सांप्रदायिक चालीप्रमाणे असावे. (काकडा सकाळी लवकर व्हावा.)
  • दिंडीत सहभागी होऊन कोणतेही व्यसन करू नये. दिंडीत चालतांना सोहळा सोडून मागे-पुढे चालू नये.
  • रिंगणात दिंडीतील सर्व पताकावाले, टाळकरी, विणेकरी, तुळशीवाली, हांडेवाली, पखवाज यांनी सहभागी व्हावे.

  • मध्य रेल्वेच्या विशेष  ८० रेल्वेगाड्या !

  • १ जुलै ते १० जुलै या  कालावधीत रेल्वेसेवा कार्यरत !

मुंबई – आषाढी वारीनिमित्त राज्यभरातील वारकर्‍यांसाठी विशेष ८० रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. ही रेल्वे सेवा १ जुलै ते १० जुलै या कालावधीत पंढरपूर आणि मिरज यांच्यासाठी चालू रहाणार आहे. त्यापैकी काही फेर्‍या मिरज – पंढरपूरदरम्यान आणि लातूर – पंढरपूर, खामगाव – पंढरपूर, अमरावती – पंढरपूर, नागपूर – पंढरपूर, भुसावळ – पंढरपूर दरम्यान उर्वरित फेर्‍या होणार आहेत.