पालख्या पुण्यात येण्यास अवघे ८ दिवस; मार्गावरील रस्ते दयनीय !

पुणे महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – लाखो वारकर्‍यांसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात २० जून या दिवशी मुक्कामी येत आहेत. असे असतांना ठिकठिकाणी राडारोडा टाकणे, तुंबलेले चेंबर, चेंबरची तुटलेली झाकणे, झाडांच्या धोकादायक फांद्या, लोंबकळणार्‍या केबल, असमान रस्ते, रस्त्यांवरील खड्डे यांमुळे वारकर्‍यांना चालतांना अडथळे निर्माण होणार आहेत, तसेच वारकर्‍यांना दुखापतही होण्याची शक्यता आहे. (पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था असणे, हे पुणे महापालिकेच्या नियोजनशून्यतेचे आणि कामचुकारपणाचे उदाहरण आहे. लाखो वारकर्‍यांच्या सुरक्षेला आणि सोयीसुविधांना प्राधान्य देण्याऐवजी प्रशासनाने हे अत्यावश्यक काम शेवटच्या क्षणी उरकण्याची धावपळ चालू करणे लज्जास्पद आहे. महापालिकेने ही कामे युद्धपातळीवर हाती घेऊन दायित्व पार पाडावे. – संपादक)

पोलीस आयुक्तांनी विभागीय आयुक्तांना पत्र लिहून धोकादायक ठिकाणे कळवली. (पोलीस विभागाने कळवेपर्यंत प्रशासन झोपा काढत होते का ? – संपादक) अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.