पंजाबमधील ८ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्येमागे आयएस्आयचे षड्यंत्र असल्याचे उघड !

४ आरोपींना अटक

चंडीगड – पंजाबमध्ये वर्ष २०१६ च्या जानेवारीपासून आतापर्यंत झालेल्या ८ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्यांच्या प्रकरणी पंजाब पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पोलीस महासंचालक सुरेश अरोरा यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, या सर्व हत्या पाकची गुप्तचर संस्था आयएस्आयच्या आदेशावरून झाल्या आहेत. तिनेच या हत्यांचे षड्यंत्र रचले होते. याद्वारे पंजाबमध्ये धार्मिक अशांतता निर्माण करण्याचा तिचा उद्देश होता. तसेच भारतविरोधी कारवायांना गती देण्याचा प्रयत्न केला गेला होता. यासाठी विविध देशांमधील आयएस्आयच्या हस्तकांनी सहभाग घेतला. ब्रिगेडियर जगदीश गगनेजा, अमित अरोरा, दुर्गादास गुप्ता, अमित शर्मा आदी ८ जणांच्या हत्या या अटक करण्यात आलेल्या चौघांनी केल्या होत्या.

१. ब्रिटनमधून आलेल्या जिम्मी सिंह याला गेल्या आठवड्यात पालम विमानतळावरून अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीनंतर मिळालेल्या माहितीवरून या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी अजून चालू असल्याने सर्वांचीच नावे घोषित करण्यात येणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

२. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जगतार सिंह जोहल उपाख्य जग्गी ब्रिटनमध्ये रहातो. गेल्या मासात त्याने विवाह केला. त्याला जालंधर येथून अटक करण्यात आली. धर्मेंद्र गुगनी मेहरबान हा लुधियाना येथे रहाणार असून त्याने या हत्यांसाठी शस्त्रे पुरवली होती.

३. या आरोपींनी जालंधर येथील दुर्गादास आणि ब्रिगेडियर जगदीश गगनेजा यांची हत्या एकाच शस्त्राद्वारे केली होती. लुधियानामधील अमित शर्मा यांच्या हत्येतही हेच शस्त्र वापरण्यात आले.

४. फेब्रुवारी २०१७ मध्ये खन्ना येथे झालेल्या सतपाल कुमार आणि त्यांच्या मुलाची हत्या, जुलै २०१७ मध्ये लुधियानामध्ये पाद्री सुल्तान मसीह यांची हत्या, तसेच येथील संघाचे नेते रविंद्र गोसांई यांच्या हत्येतही एकच शस्त्र वापरण्यात आले होते.

५. या सर्व हत्यांमध्ये ९ एम्.एम्., पॉईंट ३२ आणि पॉईंट ३० बोअरच्या पिस्तुलांचा वापर करण्यात आला.

६. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले की, यातील चौथ्या आरोपीला ७ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. तो मुख्य शूटर (नेमबाज) होता. त्याची चौकशी चालू आहे. पोलिसांकडे त्याच्या विरोधात पुरावे आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now