प्रतिदिन पती पालटणार्‍यांना राणी पद्मावतीचा जोहार काय कळणार ? – भाजपचे खासदार प्रा. चिंतामणी मालवीय

उज्जैन – अभिनेत्यांच्या घरातील महिला प्रतिदिन पती पालटतात. त्यांना राणी पद्मावतीचा जोहार काय कळणार ? त्यांना चारित्र्याचे महत्त्व कसे कळणार?, अशा शब्दांत भाजपचे खासदार प्रा. चिंतामणी मालवीय यांनी ‘‘पद्मावती’ चित्रपटाच्या संदर्भात टीका केली आहे. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची विकृती सहन केली जाणार नाही’, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे. मालवीय यांनी त्यांच्या फेसबूकवर ही पोस्ट केली आहे. ‘लोकांनी हा चित्रपट पाहू नये’, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मालवीय पुढे लिहितात की,

१. प्रत्येक भारतीय महिलेचा आदर्श असलेल्या राणी पद्मावतीचा भारतियांना गर्व आहे. तिने शिलाचे रक्षण करण्यासाठी आणि देश अन् समाज यांची लाज राखण्यासाठी म्हणून सहस्रो महिलांसह स्वत:ला अग्नीच्या स्वाधीन केले. देशासाठीच त्या सती गेल्या. या वास्तवाला विकृत पद्धतीने सादर करणे हा देशाचा अपमान आहे.

२. भन्साळीसारख्या लोकांना दुसरी कोणतीच भाषा समजत नाही. त्यांना खेटरांचीच भाषा समजते. हा देश राणी पद्मावतीचा अपमान कदापीही सहन करणार नाही. गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण आम्ही कधीही खपवून घेणार नाही.

३. अल्लाऊद्दीन खिलजीच्या दरबारातील कवींनी लिहिलेल्या चुकीच्या इतिहासावर भन्साळीने हा चित्रपट बनवला असून तो चुकीचा आहे.