धर्मनिरपेक्ष शब्द स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा खोटेपणा ! – योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी – केरळमध्ये कम्युनिस्टांच्या गुंडगिरीमुळे अराजकता माजली आहे. तेथे भाजपने काढलेल्या या अराजकतेच्या विरोधातील जनसुरक्षा यात्रेमध्ये मी सहभागी झालो होतो. तेथे लोकांना धमक्या देऊन त्यांच्या क्रूर हत्या केल्या जात आहेत. देशात कोठेही कोणीही अराजक निर्माण केले, तर त्याच्या विरोधात आम्ही संघटित होऊ, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते येथे चालू असलेल्या दैनिक जागरणच्या संमेलनात ‘धर्म’ या विषयावर बोलत होते. ‘शासनाची व्यवस्था कधीही धर्मनिरपेक्ष नसते. ती पंथनिरपेक्ष असू शकते. धर्मनिरपेक्ष शब्द स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा खोटेपणा आहे’, असेही ते म्हणाले.

योगी आदित्यनाथ यांनी मांडलेली सूत्रे

१. धर्माला आपण एखाद्या उपासनाविधीशी जोडतो, तेव्हा त्याची व्यापकता न्यून करत असतो. वास्तविक धर्म एकच आहे आणि तोही मानवता धर्म किंवा अधिक व्यापक म्हणजे सनातन धर्म आहे. अन्य सर्व पंथ आहेत. ते धर्माच्या श्रेणीमध्ये येत नाहीत.
२. कपाळाच्या मध्यभागी आपण टिळा लावतो. या ठिकाणी शरिराच्या ३ नाड्या एकत्र येतात आणि नवीन ऊर्जा निर्माण होत असते. आपल्याला या ऊर्जेचा आध्यात्मिक आणि सकारात्मक उपयोग व्हावा, यासाठी आपण तेथे टिळा लावतो. कर्मकांडाच्या नावाखाली रूढींचे पालन करण्याचा दबाव कोणीही घालू नये.
३. घरासमोर तुळशीचे रोप लावले पाहिजे आणि तिच्या पानांचा काढा प्यायला हवा. त्यामुळे डेंग्यूसारखे आजार होत नाहीत. या गोष्टी खोट्या नाहीत. भारतातील सनातन धर्माच्या प्रत्येक परंपरेला वैज्ञानिक आधार आहे, उदा. डोक्यावरील शिखा.
४. सत्ता ही लोककल्याणाचे सशक्त माध्यम आहे. मी एक आचार्य असल्याच्या नात्यानेही लोककल्याण करत आहे. धर्म आणि राजकारण एकमेकांना पूरक आहेत. दोघांना वेगळे करता येऊ शकत नाही.
५. आपण ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ असे म्हणतो किंवा ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ म्हणतो, तेव्हा सर्व जगाविषयी म्हणत असतो.
६. ‘देशात असहिष्णुता आहे’, असे म्हणणार्‍यांनी भारताला एक राष्ट्रच मानलेलेच नाही. कम्युनिस्टांचे सर्वांत मोठे अपयश हेच आहे की, त्यांनी भारताला एक राष्ट्र मानले नाही.
७. ज्यांनी हिंदुत्व समजून घेतले नाही, ते विदेशी उष्टे खाऊन स्वतःचे पोट भरत आहेत आणि तेच हिंदु आतंकवादाच्या गोष्टी करत आहेत; मात्र देशातील जनतेने त्यांना नाकारले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now