अंगारक चतुर्थीचे माहात्म्य !

आज ७ नोव्हेंबर (कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्थी) या दिवशी असलेल्या अंगारक चतुर्थीच्या निमित्ताने…

कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्थी (७.११.२०१७) या दिवशी अंगारक चतुर्थी, म्हणजे मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी आहे. श्री गणेशाच्या उपासकांमध्ये अंगारक चतुर्थीला अधिक महत्त्व असते. त्या दृष्टीने आज अंगारक चतुर्थीचे माहात्म्य सांगणारी पूर्वी घडलेली एका गणेशभक्ताची कथा येथे देत आहोत.

पूर्वी अवंती नगरात भारद्वाज नावाचे एक महान तपस्वी रहात होते. ते अग्निहोत्राचे पालन करून विद्यार्थ्यांना वेदविद्या शिकवत. एकदा ते क्षिप्रा नदीवर स्नानासाठी गेल्यावर तेथे जलक्रीडा करत असलेल्या एका अप्सरेस पाहून ते कामातुर झाले आणि त्यांचे वीर्यस्खलन झाले. पृथ्वीने ते वीर्य तिच्या उदरात ग्रहण केले. त्या रेतापासून जास्वंदीच्या फुलाप्रमाणे तांबड्या वर्णाचा एक पुत्र उत्पन्न झाला. तो सात वर्षांचा झाल्यावर त्याने पृथ्वीस विचारले, माझे शरीर इतर लोकांप्रमाणे आहे; पण माझा वर्ण इतका तांबडा कशामुळे झाला ? तेेव्हा पृथ्वीने त्याला त्याचे जन्मवृत्त सांगितले. ते ऐकून त्याने त्याच्या पित्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. पृथ्वी त्याला घेऊन भारद्वाज यांच्याकडे आली. तेव्हा भारद्वाजांनी तो आपला पुत्र आहे, हे जाणताच त्याला प्रेमाने आलिंगन दिले आणि त्याचा स्वीकार केला. काही दिवस गेल्यानंतर भारद्वाज यांनी पुत्राचे व्रतबंधन करून त्याला वेदाध्ययन करायला लावले. त्यांनी त्याला श्री गणेशमंत्राचा उपदेश केला आणि अनुष्ठान करण्याची आज्ञा केली. त्या पृथ्वीपुत्राने पित्याच्या आज्ञेप्रमाणे नर्मदेच्या काठी जाऊन एक सहस्र (हजार) वर्षे श्री गणेशाची तपश्‍चर्या केली. त्यानंतर माघ शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी साक्षात् श्री गणेश त्याच्यासमोर प्रकट झाला आणि त्यास वर माग, असे म्हणाला. त्यावर तो पृथ्वीपुत्र म्हणाला, मला स्वर्गात राहून अमृतप्राशन करण्याची इच्छा आहे. माझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध व्हावे, तसेच ज्या माघ शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी तू माझ्यावर प्रसन्न झालास, तो दिवस सर्वांना कल्याणकारी होवो, असा वर तुम्ही मला द्यावा.

श्री गणेश म्हणाला, तुला देवांसह अमृतपान करण्यास मिळेल. तुझे नाव मंगल म्हणून प्रसिद्ध होईल. तुझा वर्ण विस्तवाप्रमाणे तांबडा असल्याने अंगारक आणि तुझा जन्म पृथ्वीच्या उदरी झाल्याने भौम असेही तुला म्हणतील. नंतर श्री गणेश लुुप्त झाला. त्या ठिकाणी पृथ्वीपुत्र मंगलने दशभुजा गणपतीचे मंदिर बांधले आणि त्या गणपतीचे नाव मंगलमूर्ती असे ठेवले. नगर जिल्ह्यातील हे दशभुजा गणपतीचे क्षेत्र चिंतामणि क्षेत्र या नावाने प्रसिद्ध असून ते पारनेरच्या पश्‍चिमेस आहे. श्री गणेश सोमवती चतुर्थी, म्हणजे सोमवारी आलेल्या चतुर्थीला प्रसन्न झाला; म्हणून सोमवती चतुर्थीचे माहात्म्य मोठे आहे. भौमाचे नाव अंगारक असल्यामुळे मंगळवारी येणार्‍या चतुर्थीस अंगारक चतुर्थी असे म्हणतात. – एक भक्त

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now