Nashik Kumbh Mela : १ जूनला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पर्वस्नानाचा दिनांक घोषित होणार !

नाशिक येथे वर्ष २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा !

नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे वर्ष २०२७ मध्ये ‘सिंहस्थ कुंभमेळा’ होणार आहे. त्यातील पर्वस्नानांचा दिनांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १३ आखाड्यांचे २६ प्रतिनिधी आणि नाशिक, तसेच त्र्यंबकेश्वर येथील साधू-महंत यांच्यासह १ जूनला होणार असलेल्या बैठकीत घोषित करण्यात येईल.

कुंभमेळ्याची सिद्धता आणि नियोजन यांसाठी प्रशासनाने अनेक बैठका घेऊनही राजयोगी स्नान आणि पर्वस्नान यांचे दिनांक घोषित झाले नव्हते. त्यामुळे साधू, संत-महंत यांनी खेद व्यक्त केला होता. नाशिक जिल्ह्यासाठी पालकमंत्री नसल्याने राजयोगी स्नानांचे दिनांक घोषित करण्यास विलंब झाल्याचे समजते.

७५ वर्षांनंतर त्रिखंड योग जुळून आला !

नाशिक येथे प्रति १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. सिंह राशीमध्ये जेव्हा गुरु येतो, त्या वेळी नाशिकचे सिंहस्थ कुंभस्नान होते. ३१ ऑक्टोबर २०२६ या दिवशी दुपारी १२.०२ वाजता सिंह राशीमध्ये गुरूचे आगमन होणार आहे. ध्वजारोहणाने कुंभपर्वाला प्रारंभ होईल. त्यामुळे ऑगस्ट २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील पहिले पर्वणी स्नान होईल. १३ मासांनी गुरु पालट होऊन कुंभपर्व संपणार नाही; कारण वर्ष २०२८ पर्यंत २ वेळा गुरु वक्री होईल. २४ जुलै २०२८ या दिवशी दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी तो पुढील राशीत मार्गस्थ होईल. त्यामुळे त्या दिवशी ध्वजावतरण अर्थात् कुंभपर्वाची ध्वजा उतरवली जाईल. ज्याप्रमाणे प्रयागराज येथे १४४ वर्षांनंतर महाकुंभमेळ्याचा योग जुळून आला होता, त्याप्रमाणे नाशिकमध्ये अनुमाने ७५ वर्षांनंतर त्रिखंड योग जुळून आला असून हा कुंभमेळा वर्ष २०२८ पर्यंत चालणार आहे. यंदा २८ मास कुंभ पर्वकाळ असून त्यात ४० ते ४२ अमृतपर्व काळातील स्नान रहाणार आहे, असे पुरोहित संघाने सांगितले आहे.

काय आहे नाशिक कुंभमेळ्याचे महत्त्व !

भारतात प्रति ३ वर्षांनंतर एकदा या पद्धतीने १२ वर्षांत नाशिक (त्र्यंबकेश्वर), प्रयागराज, उज्जैन आणि हरिद्वार या ४ विविध तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळा भरतो. वर्ष १९५६ मध्ये याच पद्धतीचा कुंभमेळा आला होता. त्यामुळे यंदाच्या कुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुंभमेळा हा धार्मिक उत्सव असून यासाठी कोणालाही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही. असे असले, तरी कोट्यवधी भाविक या सोहळ्याच्या उत्साहात सहभागी होतात. या कुंभमेळ्यात राजयोगी स्नानाला विशेष महत्व आहे. या वेळी नदीमध्ये स्नान करून सूर्याला अर्घ्य देत नदीची पूजा केली जाते. या वेळी साधू-महंत वेगवेगळ्या आखाड्यातून पारंपरिक वाद्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढून येत नदीत राजयोगी स्नान करतात. या वेळी साधू-महंतांना सर्व प्रथम राजयोगी स्नान करण्याचा मान दिला जातो. साधू-संतांनी राजयोगी स्नान केल्यानंतर भक्त नदीमध्ये स्नान करतात. व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून नाशिक आणि त्रंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरत असतो. त्यात नाशिक येथे वैष्णवांचे स्नान होते, तर त्र्यंबकेश्वर येथे शैवभक्तांचे स्नान होते, अशी माहिती नाशिक पुरोहित संघाचे समन्वयक श्री. प्रतीक शुक्ल यांनी दिली.