पंजाब प्रांतात सिंधु नदीवर कालवे बांधण्याला सिंधचा विरोध
कराची (पाकिस्तान) – भारताने सिंधु जल करार रहित केल्यानंतर पाकने आता सिंधु नदीवर ६ कालवे बांधण्यास चालू केले आहे. हे सर्व कालवे पाकच्या पंजाब प्रांतात बांधले जाणार आहेत. यामुळे पाकच्या सिंध प्रांतामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यातून भेदभाव केला जात असल्याचा आरोप लोकांकडून होत आहे. याच अनुषंगाने २० मे या दिवशी निदर्शने करण्यात आली. त्यातूनच सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लांजर यांचे नौशहरो फिरोज जिल्ह्यातील घर जाळण्यात आले. तत्पूर्वी घरातील सर्व वस्तूंची तोडफोड करण्यात आली. वाहनांनाही आग लावण्यात आली. या कालव्यांना पाकिस्तान पीपल्स पार्टी पक्षासह सिंधमधील इतर पक्षांनीही विरोध केला आहे.
पाक सरकारचे म्हणणे आहे की, ‘सर्व ६ कालवे बांधून चोलिस्तान वाळवंटात सिंधु नदीच्या पाण्याने सिंचन केले जाईल. चोलिस्तान कालव्याद्वारे ४ लाख एकर भूमी सिंचनाखाली आणता येईल.’ सिंधमधील लोक सांगतात की, यामुळे सिंधमध्ये पाणी संकट निर्माण होईल. त्यांच्या वाट्याचे पाणी पंजाबला देण्याची सिद्धता चालू आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन चालू आहे. सिंधमधील महामार्गही यामुळे बंद करण्यात आले होते.