CPEC Corridor Deal : चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग अफगाणिस्तानपर्यंत वाढणार !

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन यांच्यात त्रिपक्षीय करार

पाकिस्तानचे उपपंतप्रधान असणारे परराष्ट्रमंत्री इशाक दार, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी

बीजिंग (चीन) – चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या चर्चेनंतर त्रिपक्षीय सहकार्य वाढवण्यावर आणि चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग अफगाणिस्तानपर्यंत विस्तारित करण्यास सहमती दर्शवण्यात आली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान असणारे परराष्ट्रमंत्री इशाक दार, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्यातील अनौपचारिक त्रिपक्षीय बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

१. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी चीन आणि अफगाणिस्तान यांच्या परराष्ट्रमंत्र्यांसमवेतच्या त्यांच्या भेटीचे छायाचित्र ‘एक्स’वर प्रसारित केले आहे. त्यांनी यात म्हटले आहे की, पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि विकास यांसाठी एकत्र उभे आहेत.

२. दार यांच्या कार्यालयाने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तिन्ही नेत्यांनी राजनैतिक संबंध, तिन्ही देशांमधील संवाद वाढवणे आणि व्यापार, पायाभूत सुविधा आणि विकास यांकडे वाटचाल करण्यावर चर्चा केली.

संपादकीय भूमिका

पाकिस्तान पाठोपाठ अफगाणिस्तानपर्यंत हात-पाय पसरवण्याचा चीनचा डाव आहे. या आर्थिक महामार्गामुळे भारताची डोकदुखी वाढणार आहे. यासाठी भारताने सतर्क रहाणे आवश्यक !