कोंढवा कमेला येथील अवैध पशूवधगृह तात्काळ बंद करावे !

मानद पशू कल्याण अधिकार्‍यांची निवेदनाद्वारे मागणी !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुख्यमंत्र्यांसह पू. भिडेगुरुजींनाही निवेदन

पुणे, २० मे (वार्ता.) – येथील कोंढवा कमेला येथील पशूवधगृहात अवैधरित्या जनावरांची हत्या होत आहे. या पशूवधगृहात खाटी आणि निरूपयोगी जनावरे यांचीच कत्तल करण्याची अनुमती असतांनाही उपयोगी अन् गाभण जनावरांचीही अवैधरित्या कत्तल केली जात आहे, असे गेले अनेक वर्षे निदर्शनास येत आहे, तसेच कसाई लोक हे एका ठराविक समाजाच्या लोकांची गर्दी करून तिथे नियुक्त झालेल्या पशूवैद्यकीय अधिकार्‍यावर दडपण आणत आहेत. त्यामुळे हे अवैध पशूवधगृह तात्काळ बंद करावे, तसेच या पशूवधगृहाकडे जाणार्‍या जनावरांच्या वाहतुकीवरही बंदी घालावी. त्याला पुणे महानगरपालिकेकडून पुरवली जाणारी पाणीपुरवठ्याची सेवा आणि वीजपुरवठाही खंडीत करावा, अशा मागणीचे निवेदन मानद पशू कल्याण अधिकारी राहुल कदम यांनी पुणे महापालिका आयुक्तांना दिले आहे. निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरुजी, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा आदींना देण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पशू वैद्यकीय अधिकार्‍याला तेथे कोणतेही संरक्षण नाही, तसेच त्याच्या साहाय्यासाठी कुणीही नसते. वास्तविक पुणे महानगरपालिका आणि शासकीय प्रशासन यांचे दायित्व आहे की, तेथील पशू वैद्यकीय अधिकार्‍याला निःपक्षपातीपणे काम करण्यासाठी त्याला सोबत २५ ते ३० पोलिसांचा फौजफाटा देणे आणि सीसीटीव्ही कॅमेरा कत्तलीच्या ठिकाणी बसवणे अपेक्षित आहे. आमच्या या निवेदनाचा तात्काळ विचार न झाल्यास या भागातील त्रस्त नागरिक मोठे जनआंदोलन उभारणार आहेत. त्याच्या होणार्‍या सर्व परिणामांचे नैतिक दायित्व हे आपणावरच असेल.