शरद पवारांनी संजय राऊतांवर केली टीका !

पुणे – आतंकवादाच्या विरोधात जागतिक स्तरावर परदेशात जाऊन पहलगाम आक्रमण आणि त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या कुरापती यांवर भारताची भूमिका मांडण्याचे दायित्व शिष्टमंडळावर सोपवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांना बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. हे शिष्टमंडळ सरकारचे पाप आणि गुन्हे यांचे समर्थन करील, असे विधानही संजय राऊत यांनी या वेळी केले होते.
या प्रकरणी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलतांना शरद पवार म्हणाले की, आंतरराष्ट्रीय प्रश्न उद्भवल्यानंतर पक्षीय राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्रात शिष्टमंडळ पाठवले होते. त्याचे आपण सदस्य होतो, याची आठवण त्यांनी या वेळी करून दिली.