मे महिन्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे २० जण ठार !

पुणे – पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीडसह २१ मे या दिवशी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, कोकणातही अतीवृष्टीच्या दृष्टीने ‘रेड अलर्ट’ (अतीदक्षतेची चेतावणी) जारी करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या पावसात एकूण २० जणांनी जीव गमावला. मुबंई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांसाठी यलो अन् ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. उत्तर, दक्षिण महाराष्ट्र, तसेच मराठवाडा येथे पिकांची हानी झाली आहे. अरबी समुद्रात २१ मे या दिवशी द्रोणीय स्थिती निर्माण होऊन २२ मे या दिवशी अल्प दाबाचे क्षेत्र सिद्ध होणार आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडेल.
२१ ते ३१ मे या काळात हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते, मुंबईसह कोकणात जोरदार ते अती जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांत मध्यम तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूरसह १८ जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे येथे २० मे या दिवशी सायंकाळी मुसळधार पाऊस पडल्यामुळे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरील एक्झिट प्रवेशद्वारासमोर पाण्याचे तळे साचले होते. लवकर पाणी निचरा न झाल्यामुळे प्रवाशांना पुष्कळ अडचणींना सामोरे जावे लागले. कोट्यवधी रुपये खर्चून वर्षभरापूर्वी सिद्ध करण्यात आलेल्या या नव्या टर्मिनलवर अवेळी आलेल्या पावसामुळे पाणी साचल्यामुळे पुढे पावसाळ्यात काय स्थिती होईल ? असा प्रश्न प्रवाशांना पडला. (प्रशासनाने याचा विचार केला नव्हता का ? आता तरी यावर प्रशासन काही उपाययोजना काढेल का ? – संपादक)