महावितरणच्या अधिकार्‍याला लाच स्वीकारतांना पकडले : गुन्हा नोंद

भ्रष्टाचारग्रस्त भारत

प्रतिकात्मक छायाचित्र

कुडाळ – एका सौरऊर्जा प्रकल्पाच्या (सोलरच्या) पॅनलच्या तपाससूचीवर स्वाक्षरी करण्यासाठी एका व्यक्तीकडून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना महावितरणच्या येथील कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता विजय नरसिंग जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कह्यात घेतले. या प्रकरणी जाधव यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (अनेक शासकीय कार्यालयांतून कामे करण्यासाठी जनतेकडून पैसे मागितल्याच्या तक्रारी वरचेवर घडत असतात. अशा प्रकरणांतील संबंधितांवर आतापर्यंत कठोरातील कठोर कारवाई न झाल्याने लाचखोरीचे प्रकार चालूच आहेत. हे प्रकार थांबवायचे असतील, तर सरकारने कायद्यात सुधारणा करून लाचखोरांना कठोरातील कठोर शिक्षेचे प्रावधान केले पाहिजे, जेणेकरून असे करण्याचे धाडस पुन्हा कुणी अधिकारी अथवा कर्मचारी यांना होणार नाही. – संपादक)

महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय कामे करून देण्यासाठी कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांनी स्वत: किंवा त्यांच्या वतीने अन्य कुणीही कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करत असल्यास ०२३६२ २२२२८९ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.