विशेष अन्वेषण पथकाकडून आणखी एक व्यक्ती कह्यात

बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने भूमी बळकावल्याचे प्रकरण

प्रतिकात्मक छायाचित्र

म्हापसा, २० मे (वार्ता.) – बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने भूमी बळकावल्याच्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष अन्वेषण पथकाने (‘एस्.आय.टी.’ने) संशयित विठू नागवेकर (वय ४८ वर्षे) याला कह्यात घेतले आहे. संशयित विठू नागवेकर यांनी त्याच्या मृत पावलेल्या वडिलांची बनावट स्वाक्षरी करून सुकूर गावातील ७० सहस्र चौ.मी. भूमी बळकवल्याचा आरोप आहे. तक्रारदार युरीको मास्कारीनस यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार मास्कारीनस यांच्या मते संशयित विठू नागवेकर, आलीशा नागवेकर, बार्देश तालुक्याचे संयुक्त मामलेदार रणजित साळगावकर, उत्तर गोवा कामुनिदादचे प्रशासक रोहन कासकर आणि सेरूल कोमुनिदादचे अटर्नी अग्नेलो लोबो यांनी संयुक्तरित्या आणि अनधिकृतपणे भूमी बळकावली.

विशेष अन्वेषण पथकाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता म्हणाले, ‘‘संशयिताने १७ नोव्हेंबर २०१७ या दिवशी बनावट कागदपत्रे सिद्ध केली. या आधारावर संशयिताला ‘ना हरकत दाखला’ मिळाला आणि भूमीच्या ‘म्युटेशन’साठी संमती मिळाली. (म्युटेशन म्हणजे भूमीच्या मालकी हक्कात पालट करणे). यानंतर संशयिताने भूमीच्या कागदपत्रावरील मूळ मालकाचे नाव काढून त्या जागी विठू आणि आलीशा यांचे नाव घातले. याद्वारे सेरूल कोमुनिदाद आणि अन्य यांची फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांच्या खाली संशयिताच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.