पंजाबमध्ये पोलीस आणि आतंकवादी यांच्यात चकमक : १ आतंकवादी घायाळ !

पोलिसानी जप्त केलेली पिस्तूल (सौजन्य : Punjab DGP X)

गुरुदासपूर (पंजाब) – पंजाबमधील बटाला येथे आतंकवादी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक झाली. या वेळी पोलिसांच्या गोळीबारात जतीन कुमार नावाचा आतंकवादी घायाळ झाला. या गटातील एकूण ६ आतंकवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

१. राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली. या कारवाईत ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ (बीकेआय) या खलिस्तानी आतंकवादी संघटनेच्या ६ आतंकवाद्यांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये जतिन कुमार, बरिंदर सिंह उर्फ सज्जन, राहुल मसिह, अब्राहम उर्फ रोहित, सोहित आणि सुनील कुमार यांचा समावेश आहे.

२. हा आतंकवादी गट पोर्तुगालस्थित मनिंदर बिल्ला आणि मन्नू अग्वान यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय’च्या आदेशानुसार चालवला जात होता. या गटाने अलीकडेच खलिस्तान समर्थक संघटना ‘बीकेआय’चे नेतृत्व स्वीकारले होते.

३. पोलिसांनी अटक केलेल्या या आतंकवाद्यांनी अलीकडेच बटाला येथील एका दारूच्या दुकानाबाहेर ग्रेनेडने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता.

४. या प्रकरणात बटाला पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ‘अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्या’च्या अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.