पुणे – शहरात २० मे या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघोलीजवळील सणसवाडी परिसरात मोठे होर्डिंग रस्त्यावर कोसळले. या दुर्घटनेत ७ ते ८ दुचाकी वाहने थेट होर्डिंगखाली अडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्या वेळी पावसामुळे वाहनांची गती अल्प होती आणि वाहतूकही तुलनेने मंदावलेली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलीस यांनी तात्काळ साहाय्यकार्य चालू केले. अग्नीशमनदल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली अन् अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे काम तातडीने चालू केले.
हे होर्डिंग अधिकृत अनुमतीने उभारण्यात आले होते कि नाही, याची चौकशी प्रशासनाकडून चालू करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून यामध्ये संबंधित विज्ञापन आस्थापनावर कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे शहरातील इतर ठिकाणी असलेल्या अशा धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. संबंधित विज्ञापन आस्थापनाने या होर्डिंगचा सांगाडा कमकुवत झालेला असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केले का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (या घटनेमुळे धोकादायक होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही केवळ एक अपघाती घटना नाही, तर प्रशासन, महापालिका आणि विज्ञापन आस्थापन यांच्या दुर्लक्षाचे दुर्दैवी उदाहरण आहे. संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक)