USA Destroyed Indian Mangoes : अमेरिकेने भारताचे ४ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट !

पाकिस्तानचे आंबे अधिक आयात करण्याचे कारण असल्याचा संशय व्यक्त !

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आंब्याला अमेरिकेत पुष्कळ मागणी असून प्रत्येक अमेरिकी नागरिक प्रतिवर्षी किमान २ किलो आंबे विकत घेतो. त्यातही भारत हा अमेरिकेला सर्वाधिक आंबे पुरवतो. असे असले, तरी भारतातून पाठवलेले ४ कोटी २८ लाख रुपयांचे आंबे अमेरिकेत गेल्यानंतर नष्ट करण्यात आले. अमेरिकेने याचे कारण ‘रेडिएशन’ प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमध्ये विसंगती असल्याचे सांगितले. फळांमध्ये असलेल्या कीटकांना मारण्यासाठी आणि त्यांना दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को आणि अटलांटा विमानतळांवर आंब्यांच्या पेट्या रोखण्यात आल्या. हे आंबे भारतात परत आणले जाणार नाहीत, तर तिथेच नष्ट केले जातील, कारण ते परत आणण्यासाठी पुन्हा पैसे खर्च होतील आणि ते खराब होण्याचीही शक्यता आहे.

१. भारतातील निर्यातदारांच्या मते, कीटक ही समस्या नव्हती, तर कीटकांना मारण्याच्या प्रक्रियेच्या कागदपत्रांची होती. या आंब्यांवर ८ आणि ९ मे या दिवशी मुंबईत प्रक्रिया  करण्यात आली. ही प्रक्रिया अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अधिकार्‍याच्या देखरेखीखाली झाली अन् भारतातील ‘यू.एस्.एफ्.डी.ए.’कडून (युनायटेड स्टेट्स अन्न आणि औषध प्रशासनाकडून) ‘पीक्यू २०३’ प्रमाणपत्रही दिले; परंतु यामध्ये अमेरिकेत पोचलेल्या आंब्यांच्या प्रमाणपत्रात विसंगती असल्याचे कारण देत नाकारण्यात आले.

२. पाकिस्तानसमवेत ‘क्रिप्टो करन्सी’चा (आभासी चलनाचा) करार करणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानी आंब्यांना प्राधान्य द्यावेसे वाटत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच प्रमाणपत्रात चूक असल्याचा थातूरमातूर आरोप करून भारतीय आंबे नष्ट करण्यात आले आहेत.

जगप्रसिद्ध भारतीय आंब्यांची अशी आहे आकडेवारी !

१. प्रतिवर्षी आंब्याच्या हंगामात भारतातून अमेरिकेत सरासरी २२-२३ सहस्र मेट्रिक टन आंबा निर्यात केला जातो.

२. जगातील अनुमाने ५२ टक्के आंबा उत्पादन भारतात होते. संपूर्ण जगापेक्षा अधिक आंबे एकट्या भारतात उत्पादित होतात.

३. भारतात प्रतिवर्षी सरासरी २ कोटी ६२ लाख टन आंब्याचे उत्पादन होते, तर इंडोनेशिया ४१ लाख टन, चीन ३९ लाख टन, मेक्सिको २७ लाख टन, तर पाकिस्तान केवळ २६ लाख टन आंब्यांचे उत्पादन करते. याचा अर्थ असा की, भारतात पाकिस्तानपेक्षा १० पट अधिक आंब्यांचे उत्पादन होते.

संपादकीय भूमिका

या संशयात तथ्य असल्यास यातून अमेरिकेचा विश्वासघातकीपणा पुन्हा एकदा समोर आला, असेच म्हणावे लागेल. अशा अमेरिकेकडून आपण मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि हिरे आयात करतो. भारताने सतर्क आणि चतुराईने या गोष्टींची आयात अमेरिकेऐवजी या क्षेत्रात बलाढ्य असलेल्या मित्रराष्ट्र रशियाकडून निकटच्या भविष्यात केल्यास या व्यावसायिक मुत्सद्देगिरीविषयी आश्चर्य वाटू नये !