Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : गोव्याच्या सुप्रसिद्ध समई आणि घोडेमोडणी नृत्याने भरला भक्ती अन् वीररस !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव

समई नृत्य

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी, १९ मे (वार्ता.) – येथे चालू झालेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात उपस्थित २० सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी गोव्याचे सुप्रसिद्ध पारंपरिक समईनृत्य आणि घोडेमोडणी नृत्य पाहून भारावून गेले. देश-विदेशांतून आलेल्या या धर्मप्रेमींनी पहिल्यांदाच गोव्याच्या या आध्यात्मिक लोककलांचा अनुभव घेतला. लोककलेच्या हा सांस्कृतिक वारसा पहातांना प्रेक्षक जणू भक्ती आणि वीर रसाने न्हाऊन निघाले.

गोवा राज्य कला आणि संस्कृती खाते, तसेच पर्यटन विभाग यांच्या सहकार्याने महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी दुपारच्या सत्रात लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. खात्याचे अधिकारी उमेश शिरोडकर आणि दीप्तेश गावडे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

या सांस्कृतिक सत्राचा आरंभ समई नृत्याने झाला. उसगाव येथील ‘गुरुदेव कला संघा’च्या कलाकारांनी डोक्यावर समई धरून माठाच्या ठेक्यावर अतिशय संतुलित नृत्यप्रदर्शन केले. वैशिष्ट्यपूर्ण मानवी मनोरे करून नृत्य कलाकारांनी त्यांच्या कलेचा कस लावला. संघाचे श्री. अजय गावडे यांनी या नृत्यांचे संयोजन केले होते.


 घोडेमोडणी

घोडमोडणी नृत्यातील युद्धाच्या प्रसंगाच्या वेळी ‘हर हर महादेव’च्या जयघोषामुळे वातावरणात वीरता निर्माण झाली. नृत्य करत युद्धप्रसंग दाखवणे, हे अतिशय अवघड समीकरण सर्व कलाकारांनी अतिशय सहजतेने सादर केले. तालाचा वेग वाढल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकताही तेवढीच वाढली. या नृत्याला प्रेक्षकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. हे नृत्य फोंडा येथील ‘सरस्वती कला मंडळा’चे श्री. रामा कुर्टीकर यांनी संयोजित केले.

हे गोवाचे पारंपरिक नृत्य आहे. हे नृत्य योद्ध्याची वीरता आणि पराक्रम यांचे प्रतीक आहे. लाकडापासून बनवलेल्या घोड्यांच्या प्रतिकृती कलाकार कमरेला बांधतात. मोडणी म्हणजे फेर धरून नृत्य करणे. या नृत्यात पुरुष कलाकार पारंपरिक योद्ध्याची वेशभूषा करून तलवार आणि ढाल हातांत घेतात. या नृत्यात युद्धाची रणनीती, साहस आणि पराक्रम यांची झलक बघायला मिळते. ढोल-ताशा नृत्यात वीररस निर्माण करतात. आध्यात्मिक दृष्टीकोनातून हे नृत्य धर्माचे रक्षण आणि अधर्मावरील विजयाचे प्रतीक मानले जाते. नृत्याच्या वेळी महोत्सवातील वातावरण ‘हर हर महादेव’ या घोषणेने भारावून गेले होते.


समई नृत्य

ईश्वराला वंदन करून समई नृत्याचा आरंभ केला जातो. प्रज्वलित केलेली समई आध्यात्मिक प्रकाश, शुद्धता आणि ईश्वराची उपस्थिती यांचे प्रतीक मानली जाते. हीच प्रज्वलित समई कलाकार डोक्यावर धारण करून तोल सांभाळत नृत्य करतात. हे नृत्य एकाग्रता, समर्पण आणि साधना यांचे प्रतीक आहे. या नृत्याने आत्म्याच्या आतील अंध:कार नष्ट होऊन आंतरिक प्रकाश आणि शांती निर्माण होते. आजही हे नृत्य गोव्याची संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांचे जिवंत प्रतीक बनले आहे.