फोंडा, १९ मे (वार्ता.) – साधकांच्या हृदयमंदिरात विराजमान असलेले गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव ही सर्वांसाठी एक भावपर्वणीच असते. साधक या निमित्ताने विविध माध्यमांतून गुरुदेवांना आळवतात. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या तिसर्या म्हणजे १९ मे या दिवशी साधक पुन्हा भावक्षणांत न्हाऊन निघाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्यांचे औक्षण केले. या वेळी इरोड (तमिळनाडू) येथील पुरोहित श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती आणि त्यांचे सहकारी यांनी वेदमंत्रपठण केले. या वेळी सर्व साधकांच्या वतीने श्रीसत्शक्ति आणि श्रीचित्शक्ति यांनी गुरुदेवांच्या चरणी वंदन केले.
यंदा सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे, तर वैशाख कृष्ण षष्ठी या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सवही होता. या दुग्धशर्करायोगाच्या निमित्ताने सनातन शक्तीचे भव्य दर्शन जगाने पाहिले ! या तिन्ही दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही वेगवेगळ्या सत्रांमध्ये उपस्थित होते आणि त्यामुळे साधक, धर्मप्रेमी अन् राष्ट्रप्रेमी यांना दिव्य सत्संग लाभला. यामुळे सर्वच साधकांनी भावाश्रू नयनांनी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
गुरुचरणी नृत्यसेवा
यानंतर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीने गुरुचरणी ‘गुरुचरणोंपर शीष नमाऊं’ या गीताच्या बोलांवर नृत्यसेवा सादर करण्यात आली. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. वैष्णवी गुरव, कु. बांधव्या श्रेष्ठी, कु. निधी गवारे, कु. तीर्था देवघरे, कु. म्रिणालिनी देवघरे, कु. सोनाक्षी चोपदार, कु. अपाला औंधकर, कु. शर्वरी कानस्कर, कु. अंजली कानस्कर, कु. चांदणी आसोलकर, कु. मोक्षदा देशपांडे आणि कु. वैदेही सावंत यांनी यात सहभाग घेतला. नृत्य विभागाच्या समन्वयक सौ. सावित्री इचलकरंजीकर यांनी या नृत्याचे निर्देशन केले.
कृतज्ञता गीत गायन
शेवटी ‘कृतज्ञतागीत’ सादर करण्यात आले. साधिका सौ. अपूर्वा देशपांडे, सौ. शरण्या देसाई, सुश्री तेजल पात्रीकर आणि सौ. सीमंतिनी बोर्डे यांनी सर्व साधकांच्या वतीने गीताच्या माध्यमातून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
ब्रह्मांडव्यापक कार्य करणार्या ऋषींनी सनातनला मार्गदर्शन करणे, हे आमचे सर्वांत मोठे भाग्य !![]() ‘विश्वाच्या निर्मितीपासून ब्रह्मांडाचा समतोल राखणे आणि पृथ्वीवर धर्म टिकवून ठेवणे, ही दोन महत्कार्ये ऋषी करत आहेत. या कार्याची व्यापकता पहाता, एकूण ब्रह्मांड-व्यवस्थेत ॠषींचे कार्य अलौकिक आहे, हे लक्षात येते. असे ब्रह्मांडव्यापक कार्य करणारे ॠषी सध्याच्या काळात पृथ्वीवरील छोट्याशा सनातन संस्थेला नाडीपट्ट्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. आमच्यासाठी यापेक्षा मोठे भाग्य कोणतेच असू शकत नाही. आज सनातन संस्थेच्या पाठी ॠषीगणही उभे आहेत. अशा सर्व ॠषींच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
महर्षी, संत आणि देवता यांच्या चरणी कृतज्ञता !
१७ मे या दिवशीपासून ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ चालू आहे. हा महोत्सव श्रीगुरूंना अपेक्षित असा पार पडणे, हे केवळ न केवळ महर्षि, संत आणि देवता यांच्या कृपेमुळेच शक्य आहे. महोत्सवाच्या आयोजनात विविध प्रकारचे अडथळे येऊनही त्यावर महर्षि, संत आणि देवता यांच्या कृपेमुळेच मात करता आली अन् कार्य पूर्णत्वाकडे जात आहे. यामुळेच साधकांना श्रीगुरूंच्या महोत्सवात चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती घेता येत आहे. महर्षि, संत आणि देवता यांच्या कृपेमुळेच हा कार्यक्रम पार पडत असल्यामुळे त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !
– सर्व साधक