सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव : २० मे पासून शतचंडी यागाचे आयोजन !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी, फोंडा, गोवा, १९ मे (वार्ता.) – काश्मीर येथील पहलगाम आक्रमणानंतर भारताने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरानंतर जरी ‘युद्धविराम’ झाला असला, तरी पाकिस्तानकडून विविध मार्गाने भारतविरोधी कुरापती चालूच आहेत. त्यामुळे भारत-पाक यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला पाकविरुद्धच्या युद्धात विजय मिळावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने शतचंडी याग करण्यात येणार आहे. हा याग २० मे ते २२ मे या कालावधीत दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी’त पार पडणार आहे. इरोड, तमिळनाडू येथील गुरुमूर्ती शिवाचार्य आणि शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती, यांच्यासह अन्य २५ पुरोहित या यागाचे पौरोहित्य करणार आहेत. या यागाला राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी सहभागी होऊन ‘भारताचा विजय व्हावा’ यासाठी प्रार्थना करावी. देवभूमी, तपोभूमी, अवतारभूमी आणि पृथ्वीवरील एकमेव सनातन राष्ट्र असलेल्या भारताच्या रक्षणासाठी अन् विजयासाठी होणार्या शतचंडी यज्ञाचे सप्तशतीचा सामूहिक पाठ, यज्ञविधी, आहुती आणि पूर्णाहूती आदी स्वरूप असणार आहे.
सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक –
|
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी’त आणखी ३ दिवस ‘सौंदेकर घराण्या’तील प्राचीन शस्त्रे, कोल्हापूर येथील ‘सव्यासाची गुरुकुलम्’चे शस्त्रप्रदर्शन, पुणे येथील ‘शिवाई संस्थान’चे शस्त्रप्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. हे शस्त्रप्रदर्शन ६ सहस्र चौरसफूट क्षेत्रात भव्य स्वरूपात मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाची वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ७ अशी असणार आहे.