छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचा इतिहास जपणार्‍या शिवले कुटुंबातील वंशजांचा सत्कार !

  • सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवले कुटुंबातील सदस्यांनी त्यांना छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट स्वरूपात अर्पण केल्याचा क्षण…

  • तुळापूर, पुणे येथील छत्रपती संभाजीराजांचे साखळदंड प्रथमच दर्शनासाठी बाहेर !

(डावीकडून) श्री. राहुल शिवले, श्री. कुमार शिवले, श्री. सोमनाथ शिवले, श्री. सागर शिवले, श्री. वेदांत शिवले यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी (फोंडा, गोवा), १९ मे (वार्ता.) – छत्रपती संभाजीराजांना अंतिमसमयी दिल्या गेलेल्या वेदनांचे साक्षीदार असलेल्या साखळदंडांच्या दर्शनाने धर्मासाठीच्या त्यागाचे स्मरण धर्मप्रेमींना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या निमित्ताने झाले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना बंदिस्त केलेल्या साखळदंडांचे वर्षानुवर्षे जतन करून त्यांच्या बलीदानाचा इतिहास जपणार्‍या शिवले कुटुंबातील वंशजांचा महोत्सवात सत्कार करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी शिवले कुटुंबातील वंशज सर्वश्री सागर शिवले, कुमार शिवले, सोमनाथ शिवले, दीपक टाकळकर, वेदांत शिवले यांचा सत्कार केला.

‘शिवले’ आडनावामागील अर्थ !

क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा ४० दिवस अतोनात छळ करून त्यांची हत्या करून त्यांच्या देहाचे तुकडे केले. हे तुकडे शिवले कुटुंबाच्या पूर्वजांनी एकत्र करून शिवले; म्हणून त्यांचे आडनाव ‘शिवले’ असे पडले.

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ज्या साखळदंडांनी बांधले होते, तेच साखळदंड शिवले कुटुंबाने आतापर्यंत जतन केले आहेत. आतापर्यंत कुठेही प्रदर्शनात न ठेवलेले हे साखळदंड सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्रथमच प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. ‘आपल्या राजांचा जाज्वल्य इतिहास आणि त्यांनी धर्मासाठी केलेले बलीदान यांतून सर्वांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे’, असे शिवले कुटुंबातील श्री. कुमार शिवले यांनी सांगितले.