Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : सनातन धर्माच्या ध्वजाचे ध्वजारोहण !

हिंदूंच्या इतिहासात सुवर्णाक्षरांत लिहिला जाणारा अद्वितीय दैवी क्षण !

सनातन धर्माच्या ध्वजाचे ध्वजारोहण

नभी फडकला ध्वज सनातन धर्माचा !

दैदीप्यमान सनातन धर्मध्वजाने गगन भेदिले ।
धर्मनिष्ठ हिंदूंच्या डोळ्यांचे पारणे फिटले ।।

सनातन राष्ट्र स्थापनेची चाहूल लागली ।
ध्वजाने श्रीगुरूंची कीर्ती दिगंतात केली ।।  

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी, १८ मे (वार्ता.) : हिंदु धर्माच्या स्थापनेचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या हिंदूंसाठी वैशाख कृष्ण षष्ठी, म्हणजे १८ मे २०२५ हा दिवस हिंदूंसाठी ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरांत लिहिणारा ठरला. या दिवशी हिंदु धर्माचे प्रणेते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते सनातन धर्माच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ याही उपस्थित होत्या. ध्वज हा राष्ट्र आणि धर्म यांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे सनातन धर्माच्या ध्वजारोहणाचा क्षण ‘याचि देही, याची डोळा’ बघून हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी कृतकृत्य झाले ! सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा वैशाख कृष्ण षष्ठी या तिथीच्या निमित्ताने जन्मोत्सव आहे. या दिवशी सनातन धर्माच्या ध्वजाचे ध्वजारोहण होणे, हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.

‘सनातन राष्ट्राची पहाट आता दूर नाही आणि या हिंदु धर्माची कीर्ती तिन्ही लोकांत दुमदुमेल’, हे जणू आसमंतात दिमाखात फडकणारा ध्वज सांगत होता ! 

ध्वजाची पंचोपचार पूजा करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

ध्वजारोहणाच्या आधी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते ध्वजाची पंचोपचार पूजा करण्यात आली. या वेळी इरोड, तमिळनाडू येथील अरुण गुरुमूर्ती शिवाचार्य यांनी या वेळी वेदमंत्रपठण केले, तर सनातनचे साधक श्री. दीप पाटणे यांनी शंखनाद केला. सनातनचे साधक श्री. विनायक शानभाग यांनी ध्वजमहिमा कथन केला.

सनातन धर्म ध्वजारोहण होत असतांना सूर्य मावळत होता आणि त्याची तांबूस रंगाची किरणे आसंमतात चैतन्य आणि शक्ती यांची उधळण करत होती. या वेळी आकाशाचा रंगही निळसर झाला होता, जणू देवता, ऋषिमुनी, गंधर्व हे निसर्गाच्या माध्यमातून सूक्ष्मरूपात उपस्थित राहून पुष्पवृष्टी करत आहेत.

असा आहे हा अलौकिक नि अद्वितीय असा हा ‘सनातन धर्मध्वज’ !

सनातन धर्मध्वज

महाभारताच्या युद्धात श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्या रथावर आरूढ झाले होते, त्या रथावर बसून हनुमंताने जो ध्वज हातात धरला होता, तो सनातन धर्माचा ध्वज होता. हनुमंताचा रंग शेंदरी, म्हणजे केशरी आहे; म्हणून सनातन धर्माचा ध्वज केशरी रंगाचा आहे. या ध्वजावर ‘कल्पवृक्षाच्या खाली कामधेनु उभी आहे’, असे चित्र आहे. कल्पवृक्ष आणि कामधेनु ही दोन्ही ‘समृद्धी, पालन-पोषण, संरक्षण अन् श्रीविष्णूचा अभय वरदहस्त’, यांची प्रतिके आहेत.

सनातन धर्म ध्वजारोहण झाल्यानंतर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील सुश्री तेजल पात्रीकर, सौ. सीता क्राक, सौ. भक्ती कुलकर्णी, सर्वश्री गिरीजय प्रभुदेसाई, अनिल सामंत आणि श्री. अनिकेत कदम यांनी ‘सनातन राष्ट्र धर्मसूर्य उभरा क्षात्रवीरों उठो चलो’, हे क्षात्रगीत गायले.