वर्धा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण !

वर्धा, १८ मे (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काळ्या पाण्याच्या दोन शिक्षा एकत्रित झाल्या होत्या, तसेच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी स्वतः कार्य करून अनेक क्रांतीकारकांना सिद्ध केले होते. त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्याला वेगळीच कलाटणी देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्याच्या इतिहासातील एकमेव नायक ठरतात. अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्धा नगरीत उभारलेले स्मारक नवीन पिढीला प्रेरणादायी ठरणारे असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. येथील कुमार आप्पा मार्गावरील (बॅचलर रोडवरील) स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यानामध्ये ‘प्रज्वलंत’ स्मरणिकेचे विमोचन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हा कार्यक्रम नुकताच झाला. याप्रसंगी मंचावर आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार सुमित वानखेडे, या वेळी भाजपचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘त्यांचे कारागृहातील जीवन हे त्यांच्या ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकातून वाचावयास मिळते. वर्तमानात मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला आहे, त्या मराठी भाषेत अनेक महत्त्वाचे असणारे शब्द ही सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीची अनमोल देण आहे.’’