Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : सनातनच्या साधकांचे धर्मरक्षणाचे कार्य रणभूमीतील योद्धयाप्रमाणे ! – केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे सनातन संस्थेविषयी गौरवोद्गार !

‘इवलेसे रोप लावियले द्वारी…’ या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या उक्तीप्रमाणे गोवा येथून चालू झालेल्या सनातन संस्थेच्या कार्याचा प्रसार संपूर्ण विश्वात झाला आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातन संस्था २५ वर्षे या देशात चांगली पिढी निर्माण करण्याचे कार्य करत आहे. सनातन संस्थेचे ध्येयनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ साधक तन आणि मन अर्पण करून नि:स्वार्थपणे रणभूमीतील योद्ध्याप्रमाणे कार्य करत आहेत. भारताला सनातन राष्ट्र करण्याची सनातनच्या साधकांनी भीष्मप्रतिज्ञा केली आहे, ती समस्त हिंदूंना ऊर्जा देत आहे. सनातन संस्थेचे हे कार्य समस्त देशवासियांमध्ये राष्ट्रनिष्ठा निर्माण करत आहे. सनातन राष्ट्र निर्मितीच्या कार्यात गोव्यातील सर्व धर्मप्रेमी सनातन संस्थेच्या समवेत आहेत, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

श्री. श्रीपाद नाईक

सनातन राष्ट्रासाठीचा शंखनाद हे भगवंताचे कार्य ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री

फोंडा (सच्चिदानंद परब्रह्मनगरी), १७ मे (वार्ता.) : सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत आहे, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने गोवा भूमी पावन झाली आहे. त्यांनी रोवलेली हिंदु राष्ट्राची मुहूर्तमेढ आम्ही पुढे नेत आहोत. गोवा राज्यात आक्रमकांनी लाखो हिंदूंच्या हत्या केल्या; मात्र तरीही येथील हिंदूंनी धर्माचा त्याग केला नाही. सनातन हिंदु संस्कृती अखंड ठेवण्याचे कार्य गोवावासीय करत आहेत. अशा भूमीत सनातन राष्ट्रासाठी शंखनाद होणे, हा एक शुभशकून आहे. यामुळे हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. समाजात अधर्म वाढतो, तेव्हा धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत अवतार घेतो. सनातन राष्ट्राच्या निमिर्तीसाठी येथे आलेले सर्व धर्मप्रेमी हे भगवंताचेच कार्य आहे. यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला हवे.

या कार्यक्रमाला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचे प्रतिनिधी म्हणून श्री. दर्शक हाथी हे उपस्थित होते. या वेळी श्री. दर्शक यांनी त्यांच्या समवेत सोरटी सोमनाथ येथील १ सहस्र वर्षांपूर्वीचे मूळ शिवलिंग उपस्थित संत आणि वक्ते यांना दाखवण्यासाठी व्यासपिठावर आणले होते. या वेळी श्री. दर्शक हाथी यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना हे शिवलिंग दाखवले. या वेळी ‘सुदर्शन न्यूज’चे श्री. सुरेश चव्हाणके यांनी उत्स्फूर्तपणे या शिवलिंगाविषयी माहिती सांगितली.