प.पू. भक्तराज महाराजांच्या श्रीपादुकांचे सनातनच्या आश्रमात मंगलमय आगमन !
फोंडा (सच्चिदानंद परब्रह्मनगरी), १६ मे (वार्ता.) – गुरुकृपेने असाध्य असे काहीच नाही ! हिंदूंवरील आघात नष्ट करण्यासाठी ‘सनातन राष्ट्र’ हाच एकमेव पर्याय आहे, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ओळखले आणि सनातन संस्थेच्या माध्यमातून व्यापक हिंदूसंघटन उभे केले. हे सर्व ते त्यांचे गुरु आणि थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपाशीर्वादानेच करू शकले. सनातन राष्ट्रासाठी अखंड आणि नि:स्वार्थपणे झटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्थापन केलेल्या सनातन संस्थेला आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सर्व साधकजनांवर कृपावर्षाव करण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांचे येथे आगमन झाले आहे. १६ मेच्या सायंकाळी ६ वाजता प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे इंदूरहून गोव्यातील सनातनच्या आश्रमात मंगलमय वातावरणात शुभागमन झाले. या वेळी आश्रमाच्या प्रवेशद्वारावर शिष्य डॉ. आठवले यांच्या धर्मपत्नी डॉ. (सौ.) कुंदा आठवले यासुद्धा उपस्थित होत्या.
प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुका सनातनचे साधक श्री. दिनेश शिंदे यांनी, तर प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुका साधक डॉ. अजय जोशी यांनी प.पू. बाबा यांच्या इंदूरहून आलेल्या १५ भक्तांच्या समवेत आश्रमात आणल्या. या प्रसंगी ‘हरि ॐ तत्सत् परमात्मने’चा मंगलमय मंत्रघोष करण्यात आला. या वेळी श्री. अमोल बधाले आणि सौ. वैष्णवी बधाले या साधक दांपत्याने पादुकांचे भावपूर्ण पूजन केले. सनातनच्या साधिका सौ. मंगला मराठे, सौ. प्राजक्ता पुजार, सौ. कविता परमशेट्टी आणि सौ. विदिता डोंगरे यांनी पादुकांचे औक्षण केले. सनातनच्या वेदपाठशाळेतील श्री. अमर जोशी आणि कु. श्रीनिवास देशपांडे यांनी मंत्रपठण केले.
सद्गुरूंच्या (आपल्या गुरूंच्या गुरूंच्या) पादुकांचे दर्शन घेऊन आश्रमातील सर्व साधकजन कृतकृत्य झाले. १७ मेच्या सकाळी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या स्थळावर जाण्यासाठी या पादुकांचे प्रस्थान होणार आहे.
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातील ‘पादुका मंदिर’ !
संतांचे सर्वाधिक चैतन्य त्यांच्या चरणांतून प्रक्षेपित होते; म्हणूनच आपल्या संस्कृतीत पादुकांचे पूजन करण्याची परंपरा आहे. संतांनी देहत्याग केल्यानंतरही त्यांच्यातील चैतन्य निर्गुण स्तरावर कार्यरत रहाते; म्हणूनच पादुकांच्या दर्शनातूनही भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. भारतभरातील सामाजिक उत्थानात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या १४ संतांच्या पादुका त्यांच्या मूळ स्थानावरून प्रस्थान करून या महोत्सवात अवतरित झाल्या आहेत. एकाच वेळी एकाच ठिकाणी इतक्या संख्येने पादुका असणे, ही एक दुर्मिळ घटना आहे.
शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या संतांच्या पादुका आणि साहित्य
नवनाथांपैकी कानिफनाथ
समर्थ रामदास स्वामी
प.पू. गोंदवलेकर महाराज
प.पू. ब्रह्मानंद महाराज
प.पू. गगनगिरी महाराज यांचे साहित्य
प.पू. सिद्धारूढ स्वामी
प.प. टेंब्येस्वामी
प.पू. गुळवणी महाराज
प.प. श्रीधरस्वामी
प.पू. वेणास्वामी
प.पू. भीमस्वामी महाराज, तंजावूर, तमिळनाडू
कल्याण स्वामी यांच्या पादुका आणि साहित्य
ताकपित्या विठोबा पात्र
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला आशीर्वाद देण्यासाठी थोर महापुरुषांच्या पादुकांचे आगमन !
फोंडा (गोवा) – ईश्वराचे सगुण साकार रूप म्हणजे संत ! हिंदूंच्या समृद्ध इतिहासाची पाने चाळली, तर आपल्या लक्षात येईल की, धर्माधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी युनानुयुगे अनेक संतांनी अतुलनीय कार्य करून योगदान दिले आहे. हिंदु राष्ट्र येण्यासाठी साधू-संतांचे आशीर्वाद आवश्यक आहेत. या कार्यासाठी हिंदूंना आशीर्वादरूपी आध्यात्मिक बळ देण्यासाठी आणि त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करण्यासाठी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने अशा अनेक थोर महापुरुषांच्या पादुकांचे या गोमंतक भूमीत १६ मेच्या रात्री उशिरापर्यंत आगमन होत होते.
प.पू. गगनगिरी महाराज परिधान करत असलेली कफनी आणि मोजे, तसेच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि त्यांचे शिष्य प.पू. ब्रह्मानंद महाराज यांच्या पादुकांचे, तसेच अन्य संतांच्या पादुकांचे शुभागमन बांदीवडे, फोंडा येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या अग्रशाळेत झाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते प.पू. गगनगिरी महाराज यांची कफनी आणि मोजे, तसेच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि प.पू. ब्रह्मानंद महाराज यांच्या पादुकांचे मंत्रघोषात पूजन करण्यात आले.
या वेळी सनातनचे संत पू. प्रदीप खेमका आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) सुनीता खेमका, सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. सनातनचे साधक श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी पौरोहित्य केले.
प.पू. गगनगिरी महाराज यांनी ते परिधान करत असलेली कफनी आणि मोजे ओणी, तालुका राजापूर येथील शिष्य प.पू. उल्हासगिरी महाराज यांना दिले होते. प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी ते गोवा येथे पाठवले आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण
ताकपित्या विठोबा पात्राचे आगमन झाल्यावर त्याचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी विधीवत् पूजन केले. या वेळी सेवेकरी असलेले श्री. बडवे यांनी सांगितले, ‘‘आता पूजन करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना माझे दर्शन झाले नाही. त्यामुळे त्या पात्रातील पूजेची फुले श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या ओटीत द्या आणि त्यांनी मनात जे संकल्प योजले आहेत, ते पूर्ण होतील. तसेच त्यांना या फुलांच्या माध्यमातून माझे त्यांना दर्शन होईल आणि ती फुले तुमच्याकडे कायमस्वरूपी ठेवावीत.’’
या वेळी श्री. बडवे यांनी असेही सांगितले, ‘‘काही कार्यक्रमांमुळे आम्ही पात्र घेऊन येऊ शकणार नव्हतो; पण श्री विठ्ठलाने सांगितले की, शंखनाद महोत्सवाच्या कार्यक्रमाला जाऊया, प्रत्यक्षात आम्ही शतचंडी यागासाठी काही कार्यक्रमांमुळे थांबू शकत नव्हतो; पण या यागालाही थांबण्याविषयी श्री विठ्ठलाने सांगितले.’