शंखनादारंभ !

  • ऐतिहासिक महोत्सवासाठी गोमंतक भूमी सज्ज !

  • देश-विदेशातील २५ सहस्र धर्मप्रेमी एकवटणार !

  • संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे तेजस्वी विचार ऐकण्याची पर्वणी !

ऐतिहासिक आणि भव्य वाहनफेरी

फोंडा (सच्चिदानंद परब्रह्मनगरी), १७ मे (वार्ता.) – फोंडा, गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या जनजागृतीसाठी १६ मे या दिवशी एक ऐतिहासिक आणि भव्य वाहनफेरी काढण्यात आली. ही वाहनफेरी फोंडा येथील सनातन आश्रमापासून फर्मागुडीपर्यंत निघाली, तर दुसरीकडे देशाच्या कानाकोपर्‍यांतून महोत्सवासाठी येणारी शेकडो वाहने पत्रादेवी, काणकोण इत्यादी सीमारेषांद्वारे गोव्यात प्रवेश करून सुसज्ज फेरी बनली. दुचाकी, चारचाकी आणि बसगाड्या यांवर फडकणारे भगवे ध्वज, तसेच मुखात घुमणारे ‘हर हर महादेव’, ‘सनातन धर्माचा विजय असो’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ अशा घोषणांचा नाद संपूर्ण गोव्यात घुमला. या तेजस्वी जयघोषांनी केवळ रस्तेच नव्हे, तर जनमानसही भारावून गेले. सर्वत्र एकच स्फुरण निर्माण झाले, ‘सनातन राष्ट्राचा शंखनाद !’ या फेर्‍या म्हणजे सनातन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी सनातन राष्ट्राच्या दिशेने उचललेले पुढचे पाऊल होय.

रामनाथी येथील सनातन आश्रमापासून फेरीला प्रारंभ

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ माजी सनदी अधिकारी (आय.ए.एस्) श्री. अरुण देसाई यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन केल्यानंतर वाहनफेरीला प्रारंभ झाला. ही वाहनफेरी पुढे कवळे-तिस्क फोंडा, शांतीनगर जंक्शन, गोवा बागायतदार, फोंडा पोस्ट ऑफीस कार्यालय-फोंडा येथील जुने बसस्थानक-श्री हनुमान मंदिर, फर्मागुडी येथील किल्ला येथून जाऊन फर्मागुडी येथील महोत्सवाच्या ठिकाणी फेरीची सांगता झाली. या वेळी विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

धर्मध्वज पूजनाच्या वेळी उपस्थित संत आणि मान्यवर

धर्मध्वज पूजनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी, गोवा हिंदु जनजागृती समितीचे संघटक सत्यविजय नाईक, हिंदुत्वनिष्ठ आणि आश्रमातील अनेक साधक उपस्थित होते.

वाहनफेरीत उपस्थित हिंदुत्वनिष्ठ संघटना

भारतमाता की जय संघटना, ब्राह्मण महासंघ गोवा, गोमंतक मंदिर महासंघ, शिवप्रेमी संघटना (संभाजीनगर), शिवप्रेमी संघटना (बोरी), हिंदवी स्वराज फोंडा

वाहनफेरी म्हणजे भक्तीची दिव्य वारी ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

वाहनफेरीच्या प्रारंभी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक म्हणाले, ‘‘ज्याप्रकारे आषाढी वारीसाठी लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरकडे प्रयाण करतात, त्याचप्रकारे सनातन धर्मासाठी विश्वव्यापक कार्य करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवासाठी देश-विदेशातून सहस्रो साधक आणि धर्मप्रेमी हिंदूंनी विविध मार्गाने आज गोव्यातील पंढरीत प्रवेश केला. ही केवळ वाहन फेरी नसून श्रीगुरुदेवांप्रती असलेल्या भक्तीची दिव्य वारी आहे. पत्रकार, पोलीस आदींनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा महोत्सव आहे.’’

क्षणचित्रे :

१. कपिलेश्वरी येथे सनातनच्या संत पू. सुमन मावशी यांच्या उपस्थितीत सौ. सर्वदा संदेश नाईक, सौ. अनिषा अक्षय कवळेकर आणि सौ. श्वेता नाईक यांनी धर्मध्वजाचे भावपूर्ण पूजन केले.

२. शांतीनगर फोंडा येथे मिलींद बोकाडे आणि सौ. मनिषा बोकाडे यांनी ध्वजाचे भावपूर्ण पूजन केले. या वेळी इमारतीच्या गच्चीवरून धर्मध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

३. वरचा बाजार, फोंडा येथे श्री. अरुण यशवंत शेठ वेरेकर आणि अनुराधा अरुण वेरेकर यांनी धर्मध्वजाचे भावपूर्ण पूजन केले.

४. आल्मेदा हायस्कूलसमोरून फेरी जात असतांना शाळेच्या मुलांनी ‘हर हर महादेव’ आदी घोषणा दिल्या.

५. वाहनफेरीत क्षात्रगीते लावली होती.

६. फोंडा वाहतूक पोलिसांनी फेरीच्या मार्गावर उत्तम वाहतूक सुरक्षा प्रदान केली होती.

७. फेरीत महिला आणि लहान मुले मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची वैशिष्ट्ये

१ लाख २६ सहस्र चौरस मीटर एवढ्या भव्य पटांगणात हा सोहळा पार पडत आहे. संत, विविध संप्रदायांचे प्रमुख, आध्यात्मिक अधिकारी व्यक्ती, राजकीय नेते, हिंदुत्वनिष्ठ, प्रतिष्ठित, सनातनचे साधक आदी २५ सहस्र जणांची सोय २२ एकरांहून अधिक मोठ्या जागेत ३ भव्य तंबूंमध्ये होणार आहे ! त्यांतील मध्यभागी असलेल्या मोठ्या तंबूत ८० फुटांचे भव्य व्यासपीठ उभे राहिले आहे.

भारतभरातील विविध राज्यांसह २३ देशांतील नागरिकांचा सहभाग !

पंजाबपासून तमिळनाडूपर्यंत आणि गुजरातपासून पूर्वांचलापर्यंत विविध राज्यांतील साधक आणि हिंदुत्वनिष्ठ, त्याचप्रमाणे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बहरीन, दोहा, कतार, कॅनडा, सिंगापूर, सर्बिया, इंडोनेशिया, भूतान, नेपाळ आदी देशांतून दिव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी सनातनसंस्कृतीप्रेमी, भाविक आणि भक्त येत आहेत.

सनातनच्या कालातीत कार्याची व्याप्ती उलगडणारी प्रदर्शने 

हिंदूंची क्षात्रवृत्ती जागृत करणारे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन हे येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ, शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आदी सर्वांसाठीच मोठे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. ऐतिहासिक व्यक्तीमत्त्व आणि घटना यांच्या येथे लावलेल्या प्रतिकृती हिंदूंना पुनश्च हिंदवी स्वराज्यनिर्मितीच्या ऐतिहासिक काळात नेणार आहेत !

पुढील दैवी वस्तूंचे प्रदर्शन या दैवी सोहळ्याच्या चैतन्यात भर घालणार्‍या आणि कार्यक्रमाला दैवी आधिष्ठान प्राप्त करून देणार्‍या आहेत !

१. प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेल्या स्थळांच्या ठिकाणच्या वस्तू

२. हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान राष्ट्रसंत समर्थ रामदासस्वामी यांच्या अस्तित्वाची अनुभूती देणार्‍या वस्तू

३. यज्ञसंस्कृतीला पुनरुज्जीवित करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या यज्ञकार्याचा थोडक्यात परिचय

४. नेपाळ येथील विविध शाळिग्राम आणि त्यांचे महत्त्व

५. शंखांचे महत्त्व, उत्पत्ती, प्रकार आदींची माहिती

६. भगवान शिवाची साक्षात् चेतना असणार्‍या रुद्राक्षांचे विविध प्रकार आणि महत्त्व

७. विविध दैवी तत्त्व असणारे दगड