देशभरातील सहस्रो हिंदूंचे गोमंतकभूमीत आगमन !

फोंडा (सच्चिदानंद परब्रह्मनगरी), १६ मे (वार्ता.) – अनेक दिवसांपासून ज्या क्षणांची सर्वजण आतुरतेने प्रतीक्षा करत होते, त्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला आता अवघे काही क्षण राहिले आहेत. सनातन राष्ट्राचा उद्घोष करण्याच्या हेतूने या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून सहस्रोंच्या संख्येत असणार्या हिंदूंची पावले १५ मेपासूनच गोव्याच्या दिशेने पडू लागली होती. ‘सनातन राष्ट्राचा विजय असो ।’ या जयघोषात रेल्वे, बसगाडी, खासगी वाहन, विमान अशा वाहतुकीच्या विविध साधनांद्वारे सर्वत्रच्या हिंदूंचे १६ मे या दिवशी गोव्यात आगमन झाले !
स्थानिक ठिकाणांहून निघतांना प्रत्येकच जण उत्साही आणि आनंदी होता. ‘कधी एकदा गोव्याच्या भूमीत पाऊल ठेवतो’, असे प्रत्येकालाच वाटत होते ! सर्वांकडून उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या जात होत्या, ‘सनातन राष्ट्राचा विजय असो ।’, ‘आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा विजय असो ।’, ‘हर हर महादेव ।’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ।’ या घोषणांमुळे सर्वांमध्ये क्षात्रभाव वृद्धींगत झाला होता. वाहनांवर लावलेल्या भगव्या ध्वजांमुळे वातावरणात चैतन्य पसरले होते. गोवा येथे पोचल्यावर हनुमंताच्या कृपेमुळे प्रवास निर्विघ्नपणे पार पडल्याविषयी सर्वांनी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
क्षणचित्र
जळगाव येथे हिंदूंना निरोप देण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश उपाख्य राजू भोळे उपस्थित होते.
महोत्सवात सहभागी होऊन धर्मप्रेम आणि राष्ट्रप्रेम जागृत करूया ! – नगरसेवक हेमंत नाईक गावकर
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी गोव्यात आलेले साधक आणि धर्मप्रेमी यांचे काणकोण (गोवा) येथे उत्स्फूर्त स्वागत !

काणकोण, १६ मे (वार्ता.) – फर्मागुडी, फोंडा येथे सनातन संस्था आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी कर्नाटक राज्यातून एकूण १४ बसगाड्यांमधून आलेले साधक आणि धर्मप्रेमी यांचे चार रस्ता, काणकोण येथे काणकोण नगरपालिकेचे प्रभाग क्र. १ चे नगरसेवक श्री. हेमंत नाईक गावकर आणि भाजप महिला मोर्चाच्या दक्षिण गोवा सचिव सौ. मनुजा हेमंत नाईक गावकर, दक्षिण गोवा जिल्हा प्रमुख आणि बजरंग दलाचे श्री. गौरीश भैरेली, बजरंग दलाचे श्री. धनराज देसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. शिवराज देसाई, धर्मप्रेमी श्री. मल्लेश ना. गावकर, श्री. प्रताप पागी यांनी स्वागत केले.
या वेळी पुरोहित श्री. चैतन्य यांनी नारळ वाढवून आणि नगरसेवक श्री. हेमंत नाईक गावकर आणि उपस्थित सर्व धर्मप्रेमींनी भगवे झेंडे दाखवून या सर्वांचे स्वागत केले. या वेळी नगरसेवक श्री. नाईक गावकर म्हणाले, ‘‘भारत देश हिंदु राष्ट्र होणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हे स्वप्न साकार करणे ही काळाची आवश्यकता आहे. म्हणूनच १७ ते १९ मे या कालावधीत होणार्या या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सहभागी होऊन धर्मप्रेम आणि राष्ट्रप्रेम जागृत करूया’, असे त्यांनी आवाहन केले. या वेळी सर्व उपस्थितांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम’ अशा घोषणा उत्स्फूर्तपणे दिल्या.
‘ग्राऊंड ऑफ इन्फिनिटी’ हे ऐतिहासिक ‘झुंजागाळ’ !
गोव्याच्या मध्यभागी असलेल्या फोंडा तालुक्यातील फर्मागुडी हे स्थळ भौगोलिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या पुष्कळ महत्त्वाचे अन् मोक्याचे ठिकाण आहे. येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. टेकड्या आणि हिरवीगार वनराई यांमुळे या भागाला विशेष सौंदर्य लाभले आहे.
फर्मागुडी येथील मोठे मैदान ज्या ठिकाणी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, त्याला ‘झुंजागाळ’ (युद्धभूमी) म्हणून ओळखले जाते.
महोत्सवासाठी असा सजला सनातन आश्रम…!

रामनाथी – सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा क्षण समीप आला असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे दैवी अस्तित्व असलेला सनातनचा आश्रमही महोत्सवाप्रीत्यर्थ सजला आहे…!
आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उभारलेल्या कमानीसमोर आनंदाचे तत्त्व प्रक्षेपित करणारी रांगोळी काढण्यात आली आहे. आश्रमातील विविध प्रवेशद्वारांवर सात्त्विक तोरणे लावण्यात आली आहेत. आश्रमावरील भगवा ध्वज वीरश्री जागृत करत आहे !
आश्रमाच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर स्वागतकक्षाच्या भागात आंतर्बाह्य पालट करण्यात आले आहेत. आत आल्यावर सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराजांच्या प्रतिमेच्या नूतन स्वरूपातील सजावटीच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. स्वागतकक्षात प्रवेश केल्यावर समोरच चित्त वेधून घेणारी सनातन संस्थेच्या गुरु-शिष्य बोधचिन्हाची नूतन प्रतिकृती पाहून मन आपोआपच नतमस्तक होते !
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या अनेकविध सेवांसाठी भारतभरातून आश्रमात आलेले साधक कार्यरत आहेत. महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रार्थना आणि नामजप करत साधक या सेवा करत आहेत. आश्रमात लावण्यात येणारी भक्तीगीते आणि गीतरामायणातील गीते यांमुळे सनातन राष्ट्रातील, म्हणजेच रामराज्यातील आनंदी वातावरणाची क्षणिक अनुभूतीही साधक घेत आहेत !
कार्यक्रमाची भव्यता दर्शवणारी सिद्धता !
८ सहस्र जण एकाच वेळी भोजन करू शकतील असे ३ मंडप !
१२ x १६ आकाराचे ४४ एल्.इ.डी. पडदे (स्क्रिन)
४ सहस्र ५०० चारचाकी आणि ५०० हून अधिक बसगाड्यांसाठी वाहनतळ
१ सहस्राहून अधिक स्वयंसेवक
प्रतिष्ठित आणि भाविक यांच्यासाठी एकूण
४०० हून अधिक शौचालयांची व्यवस्था
कार्यक्रमस्थळी असलेल्या विविध व्यवस्था आणि सुरक्षायंत्रणा




