Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन, ही आम्हा विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव

  • गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सामायिक मनोगत

  • पारंपरिक भारत आणि आधुनिक भारत (ट्रेडिशन अँड टेक्नोलॉजी) यावरही विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

फोंडा (सच्चिदानंद परब्रह्मनगरी), १६ मे (वार्ता.) : आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात होणारा शंखनाद महोत्सव ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आपण आधुनिक तंत्रज्ञानाला भगवद्गीतेशी जोडले, तर जीवनात पुष्कळ चांगली प्रगती करू शकतो. त्यामुळे पारंपरिक भारत आणि आधुनिक भारत दोघांची जीवनात आवश्यकता आहे. या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये होत असलेल्या कार्यक्रमाकडे ‘अजेंडा’ म्हणून न पहाता वैयक्तिक विकासाच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे, असे मत येथील ‘आयआयटी, गोवा’च्या ‘एम्.टेक.’ अंतिम वर्षाच्या कौशल श्रीवास्तव या विद्यार्थ्याने व्यक्त केले. शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनीधी श्री. विक्रम डोंगरे यांनी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या वेळी ‘पारंपरिक भारत आणि आधुनिक भारत एकत्रितपणे मार्गक्रमण करू शकतात का ?’, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांना विचारण्यात आला होता.

सनातन धर्माच्या उत्थानासाठी हा कार्यक्रम !

या प्रसंगी स्वनिश फळदेसाई या विद्यार्थ्याने सांगितले की, ‘‘गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात असा कार्यक्रम होणे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाला योगी आदित्यनाथ आणि श्री श्री रविशंकरजीही येत आहेत. येथे प्रथमच एवढा मोठा कार्यक्रम होत असल्याने प्रत्येकाने या कार्यक्रमाला उपस्थित राहून चांगला अनुभव घ्यावा.’’

त्यालाच पुढे नेत ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन’ विभागाचा पार्थ कामत म्हणाला, ‘‘सनातन धर्माच्या उत्थानासाठी हा कार्यक्रम होत आहे. आजच्या युद्धजन्य परिस्थितीत सर्व भारतियांनी एकत्र येणे, ही काळाची आत्यंतिक आवश्यकता आहे. विदेशातील भारतीय भारताची परंपरा जपून तंत्रज्ञानातही प्रगती करत आहेत. त्यामुळे पारंपरिक भारत आणि आधुनिक भारत यांची सांगड घातली गेली पाहिजे.

तंत्रज्ञानामुळे सनातन परंपरांना बळ मिळाले !

संगणक अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणार्‍या आयेश सालेलकर याने सांगितले की, पारंपरिक भारत आणि आधुनिक भारत हातात हात घालून पुढे जाऊ शकतो; कारण आपल्या परंपरांमध्येही विज्ञान लपलेले आहे. तंत्रज्ञानामुळे परंपरांना बळ मिळाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न अध्यात्म आणि तंत्रज्ञान दोघांच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकेल.

‘नवीन पिढी आपल्या संस्कृतीविषयी जागरूक असली पाहिजे. त्यासाठी तंत्रज्ञानासह परंपरा जपणे आवश्यक आहे’, असे त्याच्या सहकारी मित्राने सांगितले.