पालघर येथे गुजरातमधील जिलेटिन कांड्यांचा बेकायदा वापर !

पालघर – येथील दगड आणि खडी उत्पादनासाठी दगडखाणीत घडवण्यात येणार्‍या स्फोटासाठी गुजरातमधील जिलेटिन कांड्यांचा बेकायदा वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.

१. दगड खदानीमध्ये जिलेटिन कांड्यांच्या आणि डिटोनिएटर यांच्या साहाय्याने शक्तीशाली स्फोट घडवून त्यामधून दगड फोडले जातात. या दगडांपासून वेगवेगळ्या क्रशरमध्ये खडी निर्माण केली जाते.

२. दगडाच्या खाणींमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी शासनाची अनुमती घ्यावी लागते. जिलेटिन कांड्यांचा साठा विकत घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरंभी ‘ना हरकत’ दाखला दिला जातो. त्याआधारे परवानाधारक विक्रेत्यांकडून येथील खाणींचे मालक जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनिएटर विकत घेतात. ही सर्व खरेदी-विक्रीची प्रक्रिया ऑनलाइन अन् पारदर्शक पद्धतीने केली जाते.

३. अधिकृत पद्धतीने मिळवलेल्या जिलेटिन आणि डिटोनिएटर यांचा वापर किचकट असल्याने गैरमार्गाने येणार्‍या जिलेटिनचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.

४. गुजरात येथून छुप्या मार्गाने जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनिएटर आणले जात असल्याची माहिती संबंधितांना देण्यात येते.

५. जिलेटिनच्या कांड्यांमधून उत्खनन होणार्‍या दगडाचे अंदाजित प्रमाण ठाऊक असतांना प्रत्येक क्रशरधारकाकडे मान्यतेपेक्षा अधिक प्रमाणात गौण खनिजाचा साठा अथवा विक्री झाली आहे.

६. त्यांनी दगड कोणत्या ठिकाणाहून आणला आणि त्यासाठी संबंधितांकडे जिलेटिनची अधिकृत अनुमती होती का, याची निश्चिती करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि विस्फोटक विभाग यांच्यात समन्वय दिसून येत नाही.

संपादकीय भूमिका

पोलीस, खनिकर्म विभाग आणि महसूल विभाग यांचे यावर नियंत्रण कसे नाही ? जिलेटिन कांड्यांचा गैरवापर झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ?