रत्नागिरी – निसर्गसंपन्न वृद्धाश्रमात येणार्या वयस्करांचे ५ ते १० वर्षांनी आयुष्य वाढेल. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या संदर्भातल्या उपाययोजना, त्यांच्या काय व्यवस्था केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मंडणगड तालुक्यातील टाकेडे येथील मिलन वृद्धाश्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार भाई जगताप, सूर्यकांत दळवी, डॉ. विनय नातू, डॉ. जलिल परकार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले,
१. एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर आनंदही व्हावा आणि खंत वाटावी, अशा प्रकारचे काही कार्यक्रम असतात. आनंद याकरता की, डॉक्टर जलिल परकार यांनी अतिशय सुंदर, महाराष्ट्रातील कदाचित् पहिल्या चार-पाच वृद्धाश्रमांत ज्याची गणना करू शकतो, असा वृद्धाश्रम या ठिकाणी बांधला.
२. खंत याची की, आपल्या समाजव्यवस्थेमध्ये अलीकडच्या काळामध्ये कुटुंब लहान झाले आहे, अडचणी वाढल्या आहेत. काही प्रमाणात कौटुंबिक ओलावाही न्यून झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमांची आवश्यकता पडायला लागली.
३. भारतामध्ये परिवार संस्कृती चांगली होती. भारतात वृद्धाश्रमाची संकल्पना ही बराच काळ नव्हती; परंतु जेव्हा समाजात एखादे आव्हान उभे रहाते, या वेळी त्या आव्हानाचा सामना करण्याकरता समाजातील कुणीतरी पुढे येते आणि अशाच प्रकारे डॉक्टर जलिल परकार पुढे आले.
४. पुढच्या २० वर्षांत आपले सरासरी वय हे ८५ वर्षे होणार आहे. वर्ष २०३५ नंतर आपल्याकडे वयस्कर लोकांची संख्या प्रतिवर्षी वाढत जाणार आहे. वयस्कर लोकांच्या समस्या आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना कराव्या लागतील.
या वेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, ‘‘वृद्धाश्रमामध्ये जे वृद्ध येतात त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर प्रचंड वेदना होतात. आमच्याकडे जे वृद्धाश्रम आहेत, तिथे आजही जवळपास ४८ पेक्षाही अधिक वृद्ध आहेत. काही वेळेला इतकी वाईट परिस्थिती होते की, जेव्हा त्यांचा मृत्यू होतो, तेव्हा अग्नि द्यायलाही कुटुंबातील कुणी येत नाही. डॉक्टर जलिल परकार यांनी वृद्धाश्रम चालू करून वृद्धांना आधार दिला आहे.’’
खासदार सुनील तटकरे म्हणाले, ‘‘डॉ. परकार यांनी मिलन वृद्धाश्रमाच्या उत्तम पद्धतीने उभारण्यात आलेल्या सगळ्या खोल्या पाहून येणार्या ज्येष्ठ नागरिकांना या सगळ्या परिसरामध्ये आल्यानंतर आपल्या हक्काच्या घरामध्ये आल्यासारखे वाटेल. प्रदूषणविरहीत निसर्गरम्य वातावरण अतिशय उत्तम पद्धतीने कोकणी पद्धतीने लावलेली सगळी झाडे त्यामुळे इथे येणार्या प्रत्येक माणसाचे आयुष्य वाढेल.’’