‘ससून रुग्णालया’त ‘बाँब’ ठेवल्याची धमकी देणार्‍याला अटक

  • धमकी देण्यासाठी रुग्णाचा भ्रमणभाष चोरला !

  • रुग्णालयातील सुरक्षारक्षकच निघाला आरोपी !

पुणे – ‘ससून रुग्णालया’मध्ये काम करणार्‍या एका आधुनिक वैद्याच्या भ्रमणभाषवर ‘रुग्णालयात बाँब’ ठेवल्याची धमकी संदेशाद्वारे मिळाली. या धमकीच्या संदेशाची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सतर्कतेने प्रकरणाचे अन्वेषण चालू केले. तेव्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या एका तरुणानेच ही धमकी दिल्याची माहिती पोलिसांना खबर्‍यांच्या माध्यमांतून मिळाली. अरविंद कोकणी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

आरोपीने धमकी देण्यासाठी ‘ससून रुग्णालया’तील एका महिला रुग्णाचा भ्रमणभाष चोरला. त्यावरून एका आधुनिक वैद्याला ‘बाँब’ ठेवल्याचा संदेश पाठवला आणि भ्रमणभाष बंद करून ठेवला. दुसर्‍या दिवशी त्याने भ्रमणभाष चालू करून थेट रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना धमकीचा संदेश पाठवला आणि पुन्हा भ्रमणभाष बंद करून ठेवला. खबर्‍यांच्या आधारे कोकणी याला अटक केली आहे. ‘त्याने असे का केले ?’ याची चौकशी पोलीस करत आहेत.