जळगाव येथे पुस्तक खरेदीत भ्रष्टाचार !

  • साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष अरुण जगताप यांच्याकडून माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती उघड !

  • ग्रंथालयांपर्यंत पुस्तके पोचलीच नाहीत !

  • न्याय न मिळाल्यास मुंबईत ग्रंथालय संचालकांच्या कार्यालयासमोर उपोषणाची चेतावणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव – जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची खरेदी करण्यात आली आहे; मात्र बहुतांश ग्रंथालयांपर्यंत पुस्तकेच पोचलेली नाहीत. पुस्तकांच्या खरेदीत भ्रष्टाचार झालेला असू शकतो. या प्रकरणी संबंधितांची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथील सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष अरूण जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे. माहितीच्या अधिकारात त्यांनी ही सर्व माहिती मिळवली आहे.

जगताप यांनी ग्रंथालय संचालनालयासह राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. तसेच या प्रकरणाची निःष्पक्ष चौकशी करून ७ वर्षांपासून एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्यात यावे. योग्य तो न्याय न मिळाल्यास मुंबईत ग्रंथालय संचालकांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची चेतावणीही त्यांनी दिली आहे.

१. जळगाव जिल्हा ग्रंथालय अधिकार्‍यांनी जिल्हाभरातील बरीच ग्रंथालये आणि वाचनालये यांना पुस्तकांचा पुरवठा न करता संबंधितांकडून आधीच स्वाक्षरी आणि शिक्के असलेले ग्रंथालय, वाचनालयाचे नाव असलेले पत्र जमा करून घेतले होते. त्यांचा वापर करून पुस्तके मिळाल्याचे  बनावट पत्र सिद्ध करून घेतले.

२. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा, एरंडोल आणि जळगाव तालुक्यातील बर्‍याच वाचनालयांचा त्यात समावेश आहे.

३. संबंधित सर्व वाचनालयांना पुस्तके न देताच त्यासाठी संमत झालेला निधी परस्पर लाटल्याचा संशय आहे. (हा निधी संबंधितांकडून वसूल करून घ्यायला हवा ! – संपादक)

४. काही ग्रंथालयांना वर्ष २०१९ आणि २०२० ची पुस्तके वर्ष २०२३-२४ मध्ये वितरीत केली आहेत. काही ग्रंथालयांना तर एकही पुस्तक मिळालेले नाही.

५. काही ग्रंथालयांना ९० सहस्र रुपये किमतीची पुस्तके द्यायची होती; पण ३० सहस्र रुपयांची पुस्तके पुरवण्यात आली.

ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी ग्रंथालयांनी वेळोवळी आणि नियमानुसार पुस्तके पुरवण्यात आल्याचे सांगितले. (असे जर आहे, तर मग माहिती अधिकारांतर्गत मिळालेली माहिती खोटी समजायची का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

या प्रकरणाची तत्परतेने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी !