
पुणे – अधिकोषातील अधिकार्यांशी संगनमत करून एका व्यक्तीच्या नावाने बनावट बँक खाते उघडून कर्जाच्या माध्यमातून २ कोटी ८२ लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रणजीत कदम आणि रूपाली देसाई या आरोपींच्या विरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी अशोक नोपानी यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते आतापर्यंत घडलेला आहे.
तक्रारदाराने वर्ष २०१३ मध्ये गहुंजे (ता. मावळ) येथे ‘लोढा बिल्डर’कडून ३ खोल्यांची सदनिका घेतली होती. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी २०२२ मध्ये सदनिका विक्रीस काढली. दलालाच्या वतीने रणजीत कदम आणि त्यांची बहीण रूपाली देसाई यांनी सदनिकेच्या व्यवहारासाठी १ कोटी ९५ लाखांची बोलणी केली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये ‘ॲग्रीमेंट फॉर सेल’ झाल्यावर देसाईने कर्ज घेऊन व्यवहार पूर्ण करण्याचे आश्वासन दिले; परंतु नंतर संपर्क तोडला. यानंतर कदम आणि देसाई यांनी बँक अधिकार्यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे सिद्ध करून सदनिका परस्पर स्वत:च्या नावे करून घेतली. त्यावर ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ आणि ‘पंजाब सिंध बँक’ यांच्याकडून अनुक्रमे १ कोटी ४२ लाख आणि १ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज उचलले. याशिवाय तक्रारदाराच्या नावाने बनावट खाते उघडल्याचेही स्पष्ट झाले असून आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.