शिरगाव चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांना सरकारकडून नक्कीच न्याय मिळेल ! – राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई

पणजी, १५ मे (वार्ता.) – शिरगाव येथील चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांना सरकारकडून नक्कीच न्याय मिळणार आहे. दुर्घटनेसंबंधी सत्यशोधन समितीकडून सुपुर्द करण्यात आलेल्या अहवालाचा अभ्यास करूनच सरकार योग्य ती कारवाई करणार आहे, असा विश्वास गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी व्यक्त केला. राज्यपाल पिल्लई यांनी १५ मे या दिवशी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराईदेवीचे दर्शन घेतले.

प्रारंभी राज्यपालांचे शिरगाव येथे आगमन झाल्यावर श्री लईराई देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गावकर आणि अन्य पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी राज्यपालांची पत्नी डॉ. रिटा, स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह विविध सरकारी अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी राज्यपालांनी देवस्थानला ५० सहस्र रुपयांची देणगी दिली. शिरगाव येथील चेंगराचेंगरीत प्रकरणी सरकार स्थापित सत्यशोधन समितीने देवस्थान समिती, पोलीस, प्रशासन, स्थानिक पंचायत आणि काही बेशिस्त धोंड हे उत्तरदायी असल्याचा निष्कर्ष काढला असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी सरकारने ८ सरकारी अधिकार्‍यांना ‘कारवाई का करू नये ?’ अशी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.