विषारी पदार्थामुळे आचरा येथे १८ लाख रुपये किमतीची कोळंबी गतप्राण

प्रकल्पात विष टाकल्याच्या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद 

सौजन्य : तरुण भारत

मालवण – तालुक्यातील पारवाडी, डोंगरेवाडी (आचरा) येथे असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकल्याने अनुमाने १८ लाख रुपये किमतीची कोळंबी गतप्राण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याविषयी कोळंबी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक अपूर्व अंत्तोन फर्नांडीस (रहाणार धुरीवाडा, मालवण) यांनी आचरा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात  गुन्हा नोंद केला आहे.

ही घटना १३ मे या दिवशी रात्री घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८६, ३२४ (५) अनुसार विषारी पदार्थ टाकून मानवी जीवास हानी उत्पन्न होईल, अशी कृती करणे आणि प्रकल्पातील कोळंबीची हानी करणे अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालयातून आलेल्या ‘फॉरेन्सिक लॅब’च्या पथकाने प्रकल्पाची पहाणी केली आणि गतप्राण झालेल्या कोळंबीचे आणि घटनास्थळी सापडलेल्या विषारी पदार्थाचे नमुने कह्यात घेतले आहेत.