कणकवली – जगभरात नावलौकिक असलेल्या ‘ताज हॉटेल इंडस्ट्रीज’ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॉटेल प्रकल्प उभारावा, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ‘ताज हॉटेल’च्या व्यवस्थापनाशी बैठक घेऊन चर्चा केली. पालकमंत्री राणे यांच्या मंत्रालयातील दालनात ‘ताज हॉटेल्स अँड हॉस्पिटॅलिटी’चे व्यवस्थापकीय संचालक पुनीत चटवाल आणि कार्यकारी उपाध्यक्ष बीजल देसाई यांच्या समवेत ही बैठक झाली. जिल्ह्यातील पर्यटनवाढीच्या दृष्टीने ताज हॉटेल व्यवस्थापनाने जिल्ह्यात काम केल्यास त्यांना सर्वतोपरी सहकार्य आणि साहाय्य करू, असे आश्वासन पालकमंत्री राणे यांनी या वेळी दिले. जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठी काय करावे लागेल, याविषयी या वेळी चर्चा झाली.
बंदरे विकास विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याकडून विविध विकासकामांची पहाणी
कणकवली – महाराष्ट्र सागरी महामंडळाचे (बंदरे विकास विभागाचे) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. १५ मेपासून सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर आले आहेत. या दौर्यात त्यांनी देवबाग, रेडी बंदर, वेंगुर्ला नवीन जेटी, मालवण बंदर आदी ठिकाणी भेट देऊन विकास खात्याच्या अंतर्गत चालू असलेल्या कामांची पहाणी केली आणि उपस्थित अधिकरी अन् कर्मचारी यांना काही निर्देश दिले. बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार प्रदीप पी. यांनी हा दौरा आयोजित केला होता.