करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे होणार उद्घाटन

कणकवली – मालवण शहरातील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार, ११ मे या दिवशी पूजन केले जाणार आहे. त्यानंतर आरती केली जाणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित रहाणार आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसृष्टी उभारण्यात येणार असून त्यासाठी १०० कोटी रुपये निधीचे प्रावधान करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेनेचे आमदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी राजकोट येथे भेट देऊन पहाणी केली.
‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कणकवली तालुक्यातील करंजे येथील कै. तातू सीताराम राणे संचलित ‘गोवर्धन गोशाळे’चे उद्घाटन करण्यात येणार आहे’, अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.