वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री

सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक

श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे कामे करून घेतली जावीत. मान्सूनपूर्व उपाययोजनांवर अधिक भर देत दुरुस्तीची कामे लवकरात लवकर संपवावी. पावसाळ्याच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा सिद्ध ठेवण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक १० मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मंत्री भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आमदार नीलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भोसले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांचा ७ कलमी कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रभावीपणे काम करून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. आता १५० दिवसांच्या कालावधीत गुणवत्तापूर्ण कामे करून प्रथम क्रमांक पटकावयाचा असल्याने सर्वांनी त्या दिशेने काम करावे. कामांच्या ठिकाणी झाडे लावावीत आणि त्यांचे संगोपन करण्यात यावे.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागांच्या विविध कामांचा आणि प्रगतीपथावर असलेल्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.