पर्रा येथे १ कोटी ६५ लाख रुपये किमतीच्या अमली पदार्थासह नायजेरियन नागरिक पोलिसांच्या कह्यात

प्रतिकात्मक चित्र

पणजी, १० मे (वार्ता.) – गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने अराडी, पर्रा येथील एका भाड्याच्या घरातून २३ वर्षीय नायजेरियन नागरिक नन्येलुगो अबासिली याला ९ मे या दिवशी रात्री कह्यात घेतले. या वेळी त्याच्याकडून एकूण १ कोटी ६५ लक्ष रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले. यामध्ये २ सहस्र ४०० एक्स्टसी टॅब्लेट्स (१.१२३ ग्रॅम), ६० ग्रॅम कोकेन, ९९ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, १९ ग्रॅम क्रिस्टल एम्.डी.एम्.ए. आणि ७० सहस्र रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे. संशयित अबासिली हा २८ एप्रिल २०२५ पासून विद्यार्थी पारपत्रावर (व्हिसावर) गोव्यात वास्तव्यास होता. तेलंगाणा अमली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली आहे.

गोव्यात ६८ कोटी ३९ लक्ष रुपये किमतीचे अमलीपदार्थ कह्यात

पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता पुढे म्हणाले, ‘‘चालू वर्षाच्या पहिल्या साडेचार मासांत गोवा पोलिसांनी ६८ कोटी ३९ लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ, तसेच एकूण ७४ जणांना कह्यात घेतले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाईच्या वेळी भारतात कार्यरत असलेल्या २ आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी टोळींचाही खुलासा केला आहे.’’