शाळा बसचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे ! – परिवहनमंत्री

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – शाळा बसमधून विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमावलीत सुधारणा करतांना वाहनचालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणी यांवर विचार केला जाईल, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ते यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘स्कूल बस असोसिएशन’ आणि पालक संघटना यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये बोलत होते.

मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला परिवहन विभागाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. नियमांचे पालन न करणार्‍यांना कोणतेही संरक्षण दिले जाणार नाही. राज्यात ५० ते ६० सहस्र अनिधकृत स्कूल बस विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण करत असल्याच्या तक्रारी ‘स्कूल बस चालक-मालक संघटने’च्या पदाधिकार्‍यांनी केल्या आहेत. (एवढ्या मोठ्या संख्येत अनधिकृत वाहने रस्त्यावर असतांना प्रशासनला ते लक्षात कसे येत नाही ? तसेच प्रशासन त्यावर कारवाई का करत नाही ? – संपादक)  त्या सर्व बस चालक-मालकांनी संबंधित प्रादेशिक मोटर वाहन कार्यालयात दंडात्मक रक्कम भरून स्वत:ची ‘स्कूल बस’ अधिकृत करून घ्यावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी सरनाईक यांनी दिली.