मुख्यमंत्री सावंत यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या आढाव्यासाठी घेतली उच्चस्तरीय बैठक

उच्चस्तरीय बैठकीत अधिकार्‍यांसमवेत मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी, ९ मे (वार्ता.) – राज्यातील सर्व सुरक्षा यंत्रणा आणि वरिष्ठ अधिकारी यांची ९ मे या दिवशी सायंकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय वाढवून कार्यक्षमता आणि सज्जता यांत सुधारणा कशी करता येईल ? यावर विशेष भर देण्यात आला. सुरक्षेसंबंधी संभाव्य आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मासेमारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित

पणजी – भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारचे मासेमारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केली आहेत. यामध्ये मासेमारांना राज्याच्या सीमेच्या आतच (समुद्रकिनार्‍यावरून १२ नॉटीकल माईल्सपर्यंत) मासेमारी करणे, नौकेच्या मालकांनी नौकेत काम करणार्‍या सर्व सदस्यांची सविस्तर माहिती शासनाला देणे, मासेमारीसाठी जातांना सरकारकडून ‘मासेमारी पास’ घेणे, नौकेवरील ‘ट्रान्सपोंडर’ यंत्रणा चालूच ठेवणे आणि बंदरावर कोणतीही संशयास्पद कृती आढळ्यास सतर्क राहून त्याविषयी माहिती देणे यांचा समावेश आहे.

पणजी येथे तिरंगा यात्रा काढून काँग्रेसने भारतीय सैन्याच्या शौर्याची केली प्रशंसा

पणजी – काँग्रेसने ९ मे या दिवशी पणजी येथे काँग्रेस हाऊस येथून पणजी येथील सैन्याचे मुख्यालय आणि सिग्नल ट्रेनिंग सेंटर येथपर्यंत तिरंगा यात्रा काढून भारत-पाकिस्तान युद्धात सैन्याने दाखवलेल्या शौर्याची प्रशंसा केली.