सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी सोलापूर येथून १ सहस्र २०० हून अधिक हिंदू उपस्थित रहाणार !

डावीकडून अधिवक्ता मुकुंद कुलकर्णी, श्री. पुरुषोत्तम सग्गम, श्री. प्रसाद पंडित, श्री. हिरालाल तिवारी, श्री. राजन बुणगे, श्री. पुरणचंद्र पुलगम

सोलापूर, ९ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी सोलापूर जिल्ह्यातून १ सहस्र २०० हून अधिक हिंदू उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी यांनी दिली. ते ९ मे या दिवशी सोलापूर पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या कार्यक्रम स्थळाची प्रतिकृती

या प्रसंगी ‘प्रज्ञापुरी ज्ञानपीठ, अक्कलकोट’चे पिठासन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे योगशिक्षक श्री. पुरणचंद्र पुलगम, ‘महाराष्ट्र राज्य टेन्ट डिलर ऑर्गनायझेशन’चे प्रांतिक सदस्य श्री. पुरुषोत्तम सग्गम, ‘सोलापूर जिल्हा साऊंड सिस्टीम’चे संस्थापक उपाध्यक्ष श्री. सुनील साबळे, अधिवक्ता मुकुंद कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे उपस्थित होते.

श्री. हिरालाल तिवारी पुढे म्हणाले, ‘‘भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानमधील ९ आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले, तसेच ८ मेच्या रात्री भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानकडून भारताच्या १५ ठिकाणांवर आक्रमणाचा प्रयत्न हाणून पाडला आणि पाकिस्तानात घुसून त्याला प्रत्युत्तर दिले. या सर्व निर्णायक सैन्य कारवाईचे सनातन संस्थेच्या वतीने आम्ही मन:पूर्वक स्वागत करतो. संपूर्ण हिंदु समाज हा भारतीय सैन्याच्या समवेत एकजुटीने उभा आहे.’’

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे बोधचिन्ह

सोलापूर जिल्ह्यातून जाणारे संत-महंत, तसेच विशेष मान्यवर :

या महोत्सवासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मंदिरांचे अध्यक्ष, विश्वस्त, मंदिर पुजारी आणि पुरोहित येणार आहेत. ‘अक्कलकोट प्रज्ञापुरी ज्ञानपीठ’ यांचे पुरोहित आणि पदाधिकारी येणार आहेत. तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील भोपे पुजारी आणि उपाध्ये पुजारी, तसेच हिंदुत्वनिष्ठ येणार आहेत. ‘गरीबनाथ आखाड्या’चे महंत श्री मावजीनाथ महाराज, ‘महाराष्ट्र राज्य भावसार समाजा’चे अध्यक्ष आणि शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. बापू ढगे येणार आहेत. शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने भाजपचे आमदार श्री. विजयकुमार देशमुख, आमदार श्री. सुभाष देशमुख, आमदार श्री. देवेंद्र कोठे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासमवेत ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती’चे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, तसेच पंढरपूर येथील वारकरी संप्रदायाचे विविध हरिभक्त परायण यांनासुद्धा निमंत्रण देण्यात आले आहे.