कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन !

मुंबई – विमानतळ असलेल्या साकीनाका परिसरात एक संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. मुंबई पोलिसांना सहार विमानतळ येथून या संदर्भात भ्रमणभाष आला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. हजरत तय्यद जलाल मशिदीच्या वर, तसेच साकीनाका झोपडपट्टी परिसराच्या दिशेने गेल्याचे लोकांनी सांगितले. पहाटे ५ वाजता पोलिसांनी ‘कोंबिंग ऑपरेशन’ केले; मात्र यात असे ड्रोन वगैरे काहीही आढळून आले नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन साकीनाका पोलिसांनी केले आहे.