आरोपी आशिष मित्तल आणि अरुणकुमार सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळला

कल्याणीनगर (पुणे) पोर्शे कार अपघात प्रकरण

अपघात झालेली पोर्शे कार

पुणे – कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील कारमध्ये मागील आसनावर बसलेल्या २ अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नुमने ‘ससून रुग्णालया’त पालटल्याच्या प्रकरणी आरोपी आशिष मित्तल आणि अरुणकुमार सिंह यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला.

कल्याणीनगर येथे १८ मे २०२४ च्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने पोर्शे कार भरधाव चालवून दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील २ जणांचा मृत्यू झाला होता. चारचाकीमधील सर्व मुलांनी मद्य घेतले होते. ‘ससून रुग्णालया’मध्ये रक्तामध्ये मद्याचे प्रमाण दिसून येऊ नये म्हणून अल्पवयीन मुलांचे रक्ताचे नमुने पालकांनी ‘ससून रुग्णालया’तील आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांच्या साहाय्याने पालटण्यात आले होते.

या प्रकरणांमध्ये १० आरोपींच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. या गुन्ह्यांचे स्वरूप आणि गांभीर्य, शिक्षेची तीव्रता अन् आरोपींच्या विरोधात पुरावे, साक्षीदार आणि व्यापक समाजहिताला बाधा पोचण्याची सरकार पक्षाची भीती या सर्व गोष्टींचा विचार करून विशेष न्यायाधीश के.पी. क्षीरसागर यांनी जामीन अर्ज फेटाळला.