सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १ सहस्र ५०० हून अधिक साधक, तसेच धर्मप्रेमी हिंदू रहाणार उपस्थित !

कुडाळ – सनातन राष्ट्राचा उद्घोष, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासम सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोवा राज्यातील फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री, साधक आणि धर्मप्रेमी असे २५ सहस्रांहून अधिक हिंदूंची लाभणारी उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हा दिव्य शंखनाद हा रामराज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल. या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १ सहस्र ५०० हून अधिक साधक, तसेच धर्मप्रेमी हिंदू उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची माहिती देण्यासाठी शहरातील हॉटेल कोकण स्पाईस येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, हिंदुत्वनिष्ठ विवेक पंडित, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
संत पादुकांच्या दर्शन सोहळ्याचा मिळणार लाभ
या वेळी बोलतांना सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितले की, या महोत्सवामध्ये समर्थ रामदासस्वामी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज, सज्जनगडचे श्रीधरस्वामी, श्री कानिफनाथ स्वामी, माणगाव येथील प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज, श्री साईबाबा, प.पू. गोंदवलेकर महाराज, प.पू. गगनगिरी महाराज यांसह १० हून अधिक संतांच्या पादुकांचे एकत्रित दर्शन घेता येणार आहे. रामराज्याच्या संकल्पासाठी १ कोटी नामजपयज्ञ होणार आहे.
धर्मविरांचा होणार सत्कार
या वेळी बोलतांना हिंदुत्वनिष्ठ विवेक पंडीत यांनी सांगितले की, सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. यामध्ये हिंदु धर्मासाठी झोकून देऊन कार्य करणार्या हिंदु विरांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ हे पुरस्कार संतांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वस्तूंचे प्रदर्शन
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रास्त्रे, तसेच सनातन संस्कृती, कला, आयुर्वेद, तसेच आध्यात्मिक वस्तू यांचे प्रदर्शन असणार आहे.