पुणे येथे धोकादायक झाडे आणि झाडांच्या फांद्या तोडण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे उद्यान विभागाला आदेश !

पुणे – पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, गटारे, मलनिःसारण वाहिन्या आणि मलनिःसारण टाक्यांच्या सफाईच्या कामांना आरंभ झाला आहे. ही कामे करत असतांना धोकादायक स्थितीतील झाडे, तसेच झाडांच्या फांद्या तोडण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी उद्यान विभागाला दिले. सोसायटीतील नागरिकांनी तक्रार दिल्यानंतरही उद्यान विभागाचे कर्मचारी अद्याप ‘झाडे तोडायला मान्यता मिळालेली नाही’, असे कारण सांगत धोकादायक स्थितीतील झाडे आणि फांद्या काढत नसल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे उद्यान कर्मचार्‍यांनी नागरिकांच्या तक्रारीची वाट न पहाता शहरातील धोकादायक झाडे आणि फांद्या यांची पहाणी करून तोडावी, असे आदेश प्रशासनाने दिले. ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

असे आदेश का द्यावे लागतात ? उद्यान विभागाला स्वतःला लक्षात येत नाही का ?