शिरगाव येथील जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाल्याचे प्रकरण
डिचोली, ८ मे (वार्ता.) – शिरगाव येथील श्री लईराईदेवीच्या जत्रेत प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाले नाही आणि या प्रकरणी विद्यमान श्री लईराई देवस्थान समिती कुठेच कमी पडलेले नाही. या प्रकरणी दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी शिरगाव येथील श्री लईराई मंदिर समितीचे विद्यमान अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला भास्कर गावकर, आतिष गावकर, दयानंद गावकर आणि समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्ष दिनानाथ गावकर पुढे म्हणाले, ‘‘श्री लईराई देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गणेश गावकर यांनी देवस्थानच्या विद्यमान समितीवर केलेले आरोप हे पूर्णपणे दिशाहीन आहेत आणि या आरोपांमध्ये कसेलच तथ्य नाही. माजी अध्यक्ष गणेश गावकर यांनी त्यांच्या मागील ३ कार्यकाळांमध्ये मंदिरासाठी काहीच केले नाही, तर याउलट त्यांनी मंदिराचा निधी आणि भूमी यांचा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी वापर केला.’’ देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गणेश गावकर यांनी काही दिवसांपूर्वी जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीच्या प्रकरणावरून देवस्थान समितीच्या विद्यमान समितीवर विविध आरोप केले होते.